वृत्तसंस्था/ सेंट जोन्स (अँटिग्वा)
विंडीजचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे माजी फिरकी गोलंदाज रफिक जुमादिन यांचे मंगळवारी वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. 1972 ते 1979 या कालावधीत जुमादिन यांनी 12 कसोटीत विंडीजचे प्रतिनिधीत्व करताना 29 बळी मिळवले होते. जुमादिन यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेट विंडीजने त्यांना श्रद्धांजली वाहिली.
1978 साली जमैकाच्या सबिना पार्क मैदानावर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जुमादिन यांनी 72 धावात 4 बळी मिळविले होते. कसोटी क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. विंडीजच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये त्रिनिदाद-टोबॅगो क्रिकेट क्लबकडून जुमादिन यांनी 99 प्रथमश्रेणी सामने खेळताना 27.9 धावांच्या सरासरीने 347 गडी बाद केले. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर ते त्रिनिदाद-टोबॅगो संघाचे प्रशिक्षक आणि निवड सदस्य होते. विंडीजच्या वरिष्ठ क्रिकेट निवड समितीमध्ये त्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. गुरुवारी भारताविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यावेळी विंडीज संघातील खेळाडूंनी हाताला काळ्या फिती बांधून मैदानात प्रवेश करत जुमादिन यांना आदरांजली वाहिली.