वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिमाचल प्रदेश रणजी संघातील युवा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा याचे अल्पशा आजाराने निधन झाले. 28 वषीय सिद्धार्थ शर्माला वैद्यकीय इलाजासाठी वडोदरा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. सदर माहिती हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
2021-22 च्या क्रिकेट हंगामात विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱया हिमाचल प्रदेश संघामध्ये सिद्धार्थ शर्माचा समावेश होता. त्याने आपल्या अल्पशा क्रिकेट कारकीर्दीत 6 प्रथमश्रेणी, 6 लिस्ट ए आणि एकमेव टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यामध्ये त्याने हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करताना 33 गडी बाद केले आहेत. बडोदा आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील शेवटच्या फेरीतील सामन्यात सिद्धार्थ शर्माचा समावेश होता. पण सामना सुरू होण्यापूर्वी त्याला सातत्याने उलटय़ा होऊ लागल्याने तसेच मूत्रल समस्या निर्माण झाल्याने लागलीच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले दोन दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटना तसेच क्रिकेट क्षेत्रातील अनेक क्रिकेटपटूंनी त्याला श्रद्धांजली वाहिली.