पुणे / वार्ताहर :
पुण्यातील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात खोटे लेटर लिहून ते व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त यांचे वाचक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम दत्तू नाळे (वय 54) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पुण्यातील पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्या कार्यालयात तक्रारदार तुकाराम नाळे हे वाचक म्हणून काम करत आहेत. तीन ऑक्टोबर 2022 रोजी नामदेव चव्हाण यांच्याविरुध्द अज्ञात इसमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, महिला पोलीस उपनिरीक्षक या पदावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करुन व त्यांच्या खोटय़ा सह्या करुन चव्हाण यांची बदली व्हावी, असे लेटर लिहिले आणि ते व्हायरल केले. नामदेव चव्हाण यांना त्रास देण्याच्या उद्देशाने आरोपीने हा खोडसाळपणा केला.
अधिक वाचा : नाशकात ठाकरे गटाला खिंडार; डझनभर माजी नगसेवक शिंदे गटात सामील
आरोपीने या अर्जाच्या प्रती सर्व वरिष्ठ प्रशासकीय कार्यालये, पूर्व प्रादेशिक विभागातील पोलीस स्टेशन प्रभारी यांना पाठवून बदनामी केली असल्याचे निष्पन्न झाल्याने अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अर्ज पोलिसांकडे आल्यानंतर त्यासंर्दभात चौकशी करुन गुन्हा विलंबाने दाखल केल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस वाघमारे पुढील तपास करत आहेत.