131 तोळे सोने, साडेदहा किलो चांदी, 30 लाख 60 हजारांची रोकड लांबविली
वार्ताहर/ घटप्रभा
गोकाक शहराच्या मध्यवस्तीमध्ये असणारे क्लासवन कॉन्ट्रक्टरचे घर फोडून चोरटय़ांनी घरातील सुमारे 131 तोळे सोने, साडेदहा किलो चांदी व 30 लाख 60 हजार रुपये रोख अशा कोटय़वधी रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. प्रकाश तोळीनवर यांच्या घरात भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, प्रकाश यांच्या मुलीची सासू आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी प्रकाश हे कुटुंबासह शुक्रवारी सकाळी 11 वा. बदामीला गेले होते. त्यामुळे घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरटय़ांनी हा डाव साधला. प्रकाश हे रात्री 11 च्या सुमारास घरी परत आले असता त्यांना घराचे गेट उघडे असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहणी केली असता घराच्या खिडकीच्या सळय़ा चोरटय़ांनी वाकवून घरात प्रवेश करीत चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना कळविली असता पोलिसांनी घरी भेट देत पाहणी केली. तसेच श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केले. दिवसाढवळय़ा भरवस्तीत घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.