गुजरात टायटन्सवर 15 धावांनी विजय, गायकवाडचे अर्धशतक, गोलंदाजांचा भेदक मारा
वृत्तसंस्था/ चेन्नई
सामनावीर रुतुराज गायकवाडचे शानदार अर्धशतक, धोनीचे कुशल नेतृत्व आणि गोलंदाजांनी केलेली अप्रतिम कामगिरी यांच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्सने पहिल्या क्वालिफायर लढतीत गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव करून चौदा मोसमात दहाव्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली. गुजरात पराभूत झाले असले तरी त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे.
रुतुराज गायकवाडने अर्धशतक नोंदवताना देव्हॉन कॉनवेसमवेत दमदार अर्धशतकी सलामी दिली असली तरी मध्यफळीला त्याचा लाभ घेता न आल्याने चेन्नई सुपरकिंग्सने निर्धारित 20 षटकात 7 बाद 172 धावा जमविल्या. त्यानंतर शुबमन गिल व अखेरच्या टप्प्यात रशिद खान यांनी प्रतिकार केला तरी चेन्नईच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे गुजरातचा डाव 157 धावांत गुंडाळत चेन्नईने दिमाखात अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे मागील वर्षी पदार्पण केलेल्या गुजरात संघाची ऑलआऊट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गुजरातच्या डावात गिल व रशिद खान वगळता अन्य फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या दोघांसह वृद्धिमान साहा (12), दसुन शनाका (17), विजय शंकर (14) या अन्य तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. गिलने 38 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 42, रशिद खानने 16 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 30 धावा फटकावल्या. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. गुजरातला चेन्नईकडून 15 अवांतर धावा मिळाल्या, त्यात 13 वाईड धावांचा समावेश आहे. चेन्नईच्या जडेजाने अचूक मारा करीत 18 धावांत 2, थीक्षणाने 28 धावांत 2, दीपक चहरने 29 धावांत 2 व पथिरानाने 37 धावांत 2 तर तुषार देशपांडेने 43 धावांत 1 बळी मिळविला.
गायकवाडचे अर्धशतक
नाणेफेक गुजरात टायटन्सने जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी देत आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले. रुतुराज गायकवाड व कॉनवे यांनी शानदार सलामी देताना 10.3 षटकांत 87 धावांची भागीदारी केली. या संथ खेळपट्टीवर गायकवाड सफाईदारपणे फटकेबाजी करीत होता, पण कॉनवेला धावांसाठी झगडावे लागत होते. या दोघांनी पॉवरप्लेच्या 6 षटकांत बिनबाद 49 धावा जमविल्या. सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर चेन्नईचे व त्यांच्या भागीदारीचे अर्धशतक फलकावर लागले. गायकवाडने नंतर 36 चेंडूत वैयक्तिक अर्धशतकी मजल मारली. त्यात 6 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. 11 व्या षटकात मोहित शर्माने गुजरातला पहिले यश मिळवून देताना गायकवाडला डेव्हिड मिलरकरवी झेलबाद केले. त्याने 44 चेंडूत 60 धावा फटकावताना 7 चौकार, 1 षटकार मारला.
ही जोडी फुटल्यानंतर चेन्नईच्या डावाला गळती सुरू झाली आणि ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि त्यांची स्थिती बिनबाद 87 वरून 2 बाद 90 अशी झाली. कॉनवे संघर्ष करीत होता, तरी त्याने अजिंक्य रहाणेसमवेत 20 चेंडूत 31 धावांची भर घातली. या दोघांनी संघाचे शतक 13.1 षटकांत फलकावर लावले. नंतर रहाणेला दर्शन नलकांडेने शुबमन गिलकरवी झेलबाद करीत त्यांची भागीदारी संपुष्टात आणली. रहाणेने 10 चेंडूत 17 धावा जमविताना एक षटकार मारला. रहाणेनंतर कॉनवेदेखील लगेचच बाद झाला. त्याने 34 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 40 धावा काढल्या. अंबाती रायुडूने पुन्हा एकदा निराशा केली. त्याने 9 चेंडूत झटपट 17 धावा फटकावल्या. पण तो जास्त वेळ टिकला नाही. त्याने अल्पशा खेळीत 1 चौकार, 1 षटकार मारताना जडेजासमवेत 23 धावांची भागीदारी केली. कर्णधार धोनीही एक धाव काढून बाद झाला त्यावेळी चेन्नईची स्थिती 6 बाद 155 अशी होती. चेन्नईने 111 चेंडूत दीडशतक पूर्ण केले.
जडेजाने अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी करीत 16 चेंडूत 22 धावा फटकावून संघाला पावणेदोनशेच्या जवळ मजल मारून देताना मोईनसमवेत 7 चेंडूत 17 धावांची भर घातली डावातील शेवटच्या चेंडूवर शमीने त्याला त्रिफळाचीत केले. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार मारले तर मोईन अली 4 चेंडूत एका षटकारासह 9 धावांवर नाबाद राहिला. शिस्तबद्ध मारा केल्याने गुजरातकडून चेन्नईला केवळ 5 अवांतर धावा मिळाल्या. गुजराततर्फे मोहम्मद शमी व मोहित शर्मा यांनी आपला कोटा पूर्ण करीत प्रत्येकी 2 बळी मिळविले तर दर्शन नलकांडे, रशिद खान, नूर अहमद यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 7 बाद 172 : गायकवाड 44 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 60, कॉनवे 34 चेंडूत 4 चौकारांसह 40, शिवम दुबे 1, रहाणे 10 चेंडूत 1 षटकारासह 17, अंबाती रायुडू 9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 17, रवींद्र जडेजा 16 चेंडूत 2 चौकारांसह 22, धोनी 1, मोईन अली 4 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 9, अवांतर 5. गोलंदाजी : शमी 2-28, मोहित शर्मा 2-31, दर्शन नलकांडे 1-44, रशिद खान 1-37, नूर अहमद 1-29.
गुजरात टायटन्स 20 षटकांत सर्व बाद 157 : साहा 11 चेंडूत 12, गिल 38 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 42, हार्दिक पंड्या 7 चेंडूत 8, शनाका 16 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 17, मिलर 4, विजय शंकर 10 चेंडूत 14, तेवातिया 3, रशिद खान 16 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 30, नलकांडे 0, नूर अहमद नाबाद 7, शमी 5, अवांतर 15. गोलंदाजी : जडेजा 2-18, थीक्षणा 2-28, दीपक चहर 2-39, पथिराना 2-37, देशपांडे 1-43.