वृत्तसंस्था/ लिलिहॅमर (नॉर्वे)
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या लढतीत फेलिक्स ऍलिसिमेने स्पेनच्या कार्लोस अलकॅरेझचा पराभव करत कॅनडा संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात रॉबर्टो ऍग्युटने कॅनडाच्या व्हॅसेक पोस्पिसिलचा 3-6, 6-3, 6-3 अशा सेटस्मध्ये पराभव करून स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात कॅनडाच्या ऍलिसिमेने शुक्रवारी स्पेनच्या टॉप सिडेड अलकॅरेझला 6-7 (3-7), 6-4, 6-2 अशा सेटस्मध्ये पराभवाचा धक्का दिला. ऍलिसिमेचा त्याच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हा सर्वात मोठा विजय आहे. हा दुसरा एकेरी सामना दोन तास, 50 मिनिटे चालला होता. पुरुष दुहेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात कॅनडाच्या ऍलिसिमे आणि पोस्पिसिल या जोडीने स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्स आणि पेद्रो मार्टिनेझ या जोडीचा 4-6, 6-4, 7-5 असा पराभव केला. दुहेरी सामना जिंकून कॅनडाने स्पेनवर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. या लढतीतील रविवारी होणाऱया परतीच्या दोन सामन्यात कॅनडाला विजयासाठी केवळ एक सामना जिंकणे पुरेसे आहे. तर स्पेनला या लढतीत आपले आव्हान जिवंत राखण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागतील.
इटलीची आघाडी
इटली आणि अर्जेंटिना यांच्यातील बोलोगेना सुरू असलेल्या डेव्हिस चषक लढतीत पहिल्या दिवशी दोन्ही सलामीचे एकेरी सामने जिंकून इटलीने अर्जेंटिनावर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात इटलीच्या बेरेटेनीने अर्जेंटिनाच्या सेबेस्टियन बायेझवर 6-2, 6-3 अशी मात करून आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरने अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को सेरुनडोलोचा 7-5, 1-6, 6-3 असा पराभव केला. 2022 डेव्हिस चषक फायनल्समधील गट विभागातील लढती बोलोगेना, ग्लॅस्गो, हॅम्बुर्ग आणि व्हॅलेन्सिया या चार शहरांमध्ये 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान खेळविले जात आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. डेव्हिस चषक स्पर्धेची बाद फेरी मालेगा येथे 22 ते 27 नोव्हेंबर दरम्यान खेळविली जाईल.