अमन हकीम खानचे पहिले अर्धशतक, मोहम्मद शमी सामनावीर, निर्णायक षटकात इशांत प्रभावी, हार्दिकचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने थरारक सामन्यात यजमान गुजरात टायटन्सचा पाच धावांनी पराभव केला. या सामन्यात दिल्ली संघातर्फे अमन हकीम खानने आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकविले तर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याचे नाबाद अर्धशतक वाया गेले. या सामन्यात 11 धावात 4 गडी बाद करणारा गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्याच्या निकालानंतर विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने गुणतक्त्यात आपले आघाडीचे स्थान कायम राखताना 9 पैकी 6 सामने जिंकून 12 गुण नोंदवले आहेत तर दिल्ली संघाने 9 सामन्यातून सहा गुणासह शेवटचे स्थान कायम राखले आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अमन हकीम खानने अर्धशतक तर अक्षर पटेल व रिपल पटेल यांनी त्याला साथ देत उपयुक्त योगदान दिल्यामुळे 20 षटकांत 8 बाद 130 धावा जमविल्या. गुजरातच्या मोहम्मद शमीने 4 गडी बाद केले. त्यानंतर दिल्लीच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर गुजरात टायटन्सने 20 षटकात 6 बाद 125 धावापर्यंत मजल मारल्dयाने त्यांना हा सामना 5 धावांनी गमवावा लागला. या सामन्यातही गोलंदाजांचे वर्चस्व पाहावयास मिळाले. तसेच सोमवारी लखनौमध्ये झालेल्या सामन्याची पुनरावृत्ती शौकिनांना दिसली.
गुजरातने टायटन्सच्या डावालाही चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्याच षटकात शेवटच्या चेंडूवर खलील अहमदने साहाला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. खलील अहमदने हा पहिला बळी निर्धाव षटक टाकत मिळविला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्त्जेने गिलला सहा धावावर तंबूचा रस्ता दाखवला. इशांत शर्माने विजय शंकरचा 6 धावावर त्रिफळा उडवला. तर त्यानंतर कुलदीप यादवने डेविड मिलरला खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचित केले. गुजरातची यावेळी स्थिती 4 बाद 32 अशी होती. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि अभिनव मनोहर या जोडीने 10.3 षटकात पाचव्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केल्याने गुजरातला विजयाची संधी निर्माण झाली होती. पण खलील अहमदने अभिनव मनोहरला अमनकरवी झेलबाद केले. त्याने 33 चेंडूत 1 षटकारासह 26 धावा जमवल्या. हार्दिकला साथ देण्यासाठी राहुल तेवातिया मैदानात आला. तेवातियाने नॉर्त्जेला सलग तीन षटकार ठोकत सातव्या गड्यासाठी 28 धावांची भर घातली. शेवटचे षटक टाकण्यासाठी इशांत शर्माकडे चेंडू सोपविण्यात आला. या षटकामध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खान यांना विजयाचे उद्दिष्ट गाठता आले नाही. इशांतने या षटकातील चौथ्या चेंडूवर तेवातियाला रॉसोकरवी झेलबाद केले. त्याने 7 चेंडूत 3 षटकारासह 20 धावा जमवल्या. गुजरात संघाला यावेळी विजयासाठी 2 चेंडूत 9 धावांची जरुरी होती. पण इशांत शर्माने गुजरातच्या या फलंदाजांना विजयापासून रोखण्यात यश मिळवले. 20 षटकात गुजरात टायटन्सने 6 बाद 125 धावा जमवल्या. कर्णधार हार्दिक पंड्याने 53 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 59 तर रशीद खानने 2 चेंडूत नाबाद 3 धावा जमवल्या. गुजरातला अवांतराच्या रुपात 5 धावा मिळाल्या. गुजरातच्या डावात 4 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे खलिल अहमद आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर नॉर्त्जे आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात अक्षर पटेलला बळी मिळाला नाही. पण त्यानेही अचूक मारा करीत 24 धावा दिल्या.
मोहम्मद शमीचा धुमाकूळ
तत्पूर्वी या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या डावाला पहिल्या चेंडूपासूनच गळती लागली. सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या पहिल्याच चेंडूवर सॉल्टला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. त्यानंतर डावातील दुसऱ्या षटकात डेविड वॉर्नर रशीद खानच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे धावचित झाला. त्याने दोन धावा जमवल्या. मोहम्मद शमीने आपल्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर दिल्लीला आणखी एक धक्का देताना रॉसोला यष्टीरक्षक साहाकरवी झेलबाद केले. त्याने 2 चौकारासह 8 धावा जमवल्या. मनीष पांडे शमीचा तिसरा बळी ठरला. पांडेने केवळ 1 धाव जमवली. शमीने प्रियम गर्गला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले. त्याने 14 चेंडूत 10 धावा जमवल्या. दिल्लीची स्थिती 5 षटकात 5 बाद 23 अशी केविलवाणी झाली होती. यामध्ये मोहम्मद शमीचा 4 बळींचा समावेश होता.
अष्टपैलू अक्षर पटेल आणि अमन हकीम खान यांनी दिल्लीचा डाव सावरताना सहाव्या गड्यासाठी 8 षटकात 50 धावांची भागीदारी केली. मोहित शर्माने ही जोडी फोडताना अक्षर पटेलला रशीद खानकरवी झेलबाद केले. त्याने 30 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 27 धावा जमवल्या. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर रिपल पटेलने अमन खानला बऱ्यापैकी साथ दिल्याने दिल्ली कॅपिटल्सला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. या जोडीने सातव्या गड्यासाठी 27 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. रशीद खानने अमन खानला झेलबाद केले. त्याने 44 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 51 धावा जमवल्या. अमन खानचे या स्पर्धेतील हे पहिले अर्धशतक आहे. मोहित शर्माने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर रिपल पटेलला हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले. त्याने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 23 धावा जमवल्या. नॉर्त्जे 3 धावावर नाबाद राहिला. दिल्लीला अवांतराच्या रुपात 5 धावा मिळाल्या. गुजरातर्फे मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 11 धावात 4 तर मोहित शर्माने 33 धावात 2 आणि रशीद खानने 28 धावात एक गडी बाद केला. दिल्लीच्या डावात 5 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 8 बाद 130 (अमन खान 44 चेंडूत 51, अक्षर पटेल 30 चेंडूत 27, रिपल पटेल 13 चेंडूत 23, गर्ग 10, वॉर्नर 2, रॉसो 8, अवांतर 5, शमी 4-11, मोहित शर्मा 2-33, रशीद खान 1-28).
गुजरात टायटन्स 20 षटकात 6 बाद 125 (साहा 0, गिल 6, हार्दिक पंड्या 53 चेंडूत नाबाद 59, विजय शंकर 6, मिलर 0, अभिनव मनोहर 33 चेंडूत 26, तेवातिया 7 चेंडूत 20, रशिद खान नाबाद 3, अवांतर 5, खलील अहमद 2-24, इशांत शर्मा 2-23, नॉर्त्जे 1-39, कुलदीप यादव 1-15).