Death of Asha Sevaka Mrs. Lakshmi Parab
कारिवडे पेडवेवाडी येथील आशा सेविका सौ. लक्ष्मी कृष्णा परब (३६ ) यांचे गुरुवारी मध्यरात्री गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी सकाळी त्यांना सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात नेण्यात आले.
त्यांच्या आकस्मित व अकाली निधनाने परब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. आशा सेविका म्हणून विनम्र व प्रामाणिकपणे सेवा केलेल्या लक्ष्मी परब यांच्या आकस्मित निधनाचा सर्वांनाच धक्का बसला. कोरोना काळातही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गावात चांगली सेवा दिली होती. त्यांच्या निधनाचे सकाळी वृत्त समजताच कारीवडे गावावर शोककळा पसरली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सैनिक बँकेच्या सावंतवाडी शाखेचे कर्मचारी कृष्णा परब यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासु, दिर, जाऊ, भावजय असा परिवार आहे.
ओटवणे / प्रतिनिधी