ऑनलाईन टीम / तरुण भारत :
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आझमी यांच्या पीएला हा धमकीचा फोन आला होता. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी औरगंजेबाचं समर्थन करणारं विधान केलं होतं. त्यावरून आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी आझमी यांच्या पीएला अज्ञाताने फोन केला. “अबू आझमींना फोन दे. तो पुन्हा बोलला तर उडवून टाकणार. कापून टाकणार”, असं म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच पीएलाही शिवीगाळ करण्यात आली. धमकीच्या या फोननंतर आझमी यांच्या पीएने कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अज्ञात आरोपीवर भादंवि कलम 506 (2) आणि 504 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आझमी यांना धमकी देणारा व्यक्ती कोण आहे, यामागे कोणत्या संघटनांचा हात आहे का? याचा तपास कुलाबा पोलिसांनी सुरू केला आहे.