7 लाख रुपये किंमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात क्षयरोगामुळे (टीबी) दरवर्षी सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. केंद्र सरकार 2025 पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्याची मोहीम चालवत आहे. टीबीच्या दोन औषधांवरून लोकसभेत शुक्रवारी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी प्रश्न विचारले. टीबी संसर्गजन्य आजार असताना ड्रग रेजिस्टेंट टीबीसाठी बेंडाक्यूलाइन आणि डेलामाइंड ही औषधे उपलब्ध झाली आहेत, परंतु या औषधांची भारतात टंचाई असून ती खासगी रुग्णालयांमध्ये का मिळत नाहीत अशी विचारणा चौधरी यांनी सरकारला केली.
ड्रग रेजिस्टेंट टीबीसाठी वापरल्या जाणाऱया दोन्ही औषधांची टंचाई वाढत असताना सरकार ते उपलब्ध असल्याचे सांगत आहे. हे औषध सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे का असा माझा प्रश्न असल्याचे चौधरी यांनी संसदेत बोलताना म्हटले. चौधरींच्या प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उत्तर दिले आहे.
मल्टी ड्रग रेजिस्टेंट टीबीचे रुग्ण वाढत आहे. पूर्वी याचे निदान झाल्यावर उपचार सुरू व्हायचे, परंतु आता सरकारने तंत्रज्ञानाद्वारे अशा रुग्णांची ओळख पटविण्याची सुविधा दिली आहे. ही दोन्ही औषधे सर्व शासकीय रुग्णालयात उपब्लध आहेत, हे महागडे औषध असून ती खासगी रुग्णालयात मिळणार नाहीत. क्षयरोगाचा रुग्ण शासकीय रुग्णालयात यावा, त्याला हे औषध मिळावे असा सरकारचा उद्देश आहे. सर्व रुग्णांना मोफत स्वरुपात हे औषध दिले जाते. सरकार मोफत स्वरुपात औषध पुरवत असताना खासगीत ते घेण्याची गरज काय असे प्रश्नार्थक विधान राज्यमंत्र्यांनी केले आहे.
बेंडाक्यूलाइन आणि डेलामाइंड ही दोन्ही हाय अँटीबायोटिक्स आहेत, या औषधामुळे ड्रग रेजिस्टेंट टीबीच्या रुग्णांना मोठा लाभ झाला आहे. या औषधामुळे क्षयरोगाच्या उपचाराचा कालावधी 24 महिन्यांवरून कमी होत 9 महिन्यांवर आला आहे. बेंडाक्यूलाइन हे अत्यंत महागडे औषध आहे, याच्या एका वॉयलची किंमत 7 लाख रुपये आहे. केंद्र सरकार हे औषध सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत स्वरुपात उपलब्ध करत आहे. तर डेलामाइंड औषधाची किंमत 1.50 लाख रुपये आहे, हे औषध देखील शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्यात येत आहे.