वृत्तसंस्था/ दुबई
भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू दीप्ती शर्माने आयसीसी महिलांच्या ताज्या टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत दीप्ती शर्माची कामगिरी अधिक दर्जेदार झाली.
टी-20 महिला गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या दीप्ती शर्माने विंडीजच्या हेली मॅथ्यूजला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. आशिया चषक महिला टी-20 स्पर्धेत दीप्ती शर्माने पाकविरुद्धच्या सामन्यात 27 धावात 3, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 13 धावात 2 तर थायलंडविरुद्धच्या सामन्यात 10 धावात 2 गडी बाद केले. टी-20 महिलांच्या ताज्या गोलंदाजांच्या मानांकन यादीत ब्रिटनची सोफी इक्लेस्टोन पहिल्या तर ब्रिटनची सारा ग्लेन दुसऱया स्थानावर आहे. टी-20 अष्टपैलूंच्या ताज्या मानांकन यादीत दीप्ती शर्माने तिसरे स्थान मिळविले असून विंडीजची हेली मॅथ्यूज आणि सोफी डीव्हाईन आघाडीवर आहेत.
टी-20 च्या महिलांच्या फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची फलंदाज जेमिमा रॉड्रीग्युजने पहिल्या दहा खेळाडूमध्ये स्थान मिळविले आहे. लंकेविरुद्धच्या सामन्यात रॉड्रीग्युजने 76 धावा झोडपल्या होत्या. दरम्यान फलंदाजांच्या यादीत बेथ मुनी पहिल्या स्थानावर असून नंतरच्या चार स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही.