‘आप’च्या एका आमदारासह 3 अपक्षांचा भाजपला पाठिंबा
गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये भाजपच्या विक्रमी विजयानंतर भूपेंद्र पटेल सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या 24 तास आधीच राज्यात पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. आम आदमी पक्षाच्या (आप) एका आमदारासह अन्य तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, त्यांनी पक्षात प्रवेश नाकारला आहे. या चौघांपैकी तिघेजण पूर्वी भाजपमध्येच होते.
‘आप’चे आमदार भूपत भयानी जुनागढ जिह्यातील विसावदर मतदारसंघातून विजयी होऊन प्रथमच विधानसभेत पोहोचले आहेत. ते यापूर्वीही भाजपमध्ये होते. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारणा केली असता मतदारसंघातील जनतेने कौल दिल्यास आपण पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले. मी बालपणापासून आरएसएसचा स्वयंसेवक होतो. माझी विचारधारा सर्वांना माहित असून आरएसएस ही एक सर्वोत्कृष्ट संघटना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विसावदर विधानसभा निवडणूक जिंकून आम आदमी पक्षाचे आमदार झालेले भूपत भयानी हे या भागातील दबंग नेते म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपची साथ सोडत ‘आप’मध्ये प्रवेश केला. या जागेवरून भाजपने काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या हर्षद रिबडिया यांना तिकीट दिले होते.
अपक्ष आमदार भाजपच्या पाठीशी
भाजपने पूर्ण बहुमत मिळवत सत्ता कायम ठेवली असली तरी आता अपक्ष आमदारांनी भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला आहे. बायडचे आमदार धवल झाला, धानेरातील मावजी देसाई आणि वाघोडियातील आमदार धर्मेंद्र वाघेला या तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने धवल झाला आणि मावजी देसाई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या रणधुमाळीत त्यांनी मतदारासंघातील स्वतःचा करिष्मा सिद्ध करत विजय संपादन केला होता.
भाजप 156, काँग्रेस 17, आप 5 जागा
गुजरातमधील विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजपने विक्रमी 156 जागा जिंकल्या आहेत. 2017 च्या तुलनेत भाजपच्या 58 जागा वाढल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसला सर्वाधिक 60 जागांचे नुकसान झाले आहे. गेल्या वेळी पक्षाला 77 जागा मिळाल्या होत्या. आता त्यांना केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाने 5 जागा जिंकल्या आहेत. तसेच अपक्षांनी तीन आणि सपाने एक जागा जिंकली आहे.