काँग्रेसच्या दिल्ली शाखेचे प्रमुख अरविंदरसिंग लवली यांनी पक्षाच्या सर्व पदांचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाशी युती करण्याच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या निर्णयाचा निषेध म्हणून आपण पदत्याग करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिल्लीत काँग्रेसमधील मतभेद उफाळले आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या साहव्या टप्प्यात दिल्लीच्या सात जागांवर मतदान होणार आहे. या मतदानाला आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेला असताना प्रदेश अध्यक्षाने पद सोडल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीत दिल्लीत काँग्रेसला सातपैकी केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अरविंदरसिंग लवली नाराज होते.
खर्गेंना पाठविले पत्र
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लवली यांनी आपले त्यागपत्र पाठविले आहे. काँग्रेसने दिल्लीशी कोणताही संबंध नसलेल्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीची तिकीटे दिली आहेत. अशा बाहेरच्या उमेदवारांसाठी दिल्लीच्या कार्यकर्त्यांना काम करण्यास सांगण्यात येत आहे. आम आदमी पक्षाशी युती केल्याच्या निषेधार्थ मी काँग्रेसमधील सर्व पदांचा त्याग करीत आहे, असे त्यांनी खर्गे यांना कळविल्याची माहिती देण्यात आली.