मिरवणूक ऐतिहासिक-वैभवशाली ठरणार : उत्कृष्ट देखावे सादरीकरणासाठी मंडळांची धडपड : कार्यकर्ते-कलाकारांचा उत्साह शिगेला
प्रतिनिधी / बेळगाव
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक एक दिवसावर येऊन ठेपल्याने तयारीला वेग आला आहे. ऐतिहासिक आणि वैभवशाली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक उत्साहात करण्यासाठी शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. या पार्श्वभूमीवर चित्ररथ मिरवणुकीसाठी ट्रक आणि ट्रॅक्टरच्या चेसींचे काम वेगाने सुरू झाले आहे. शहरात 64 हून अधिक मंडळे देखावे सादर करणार आहेत. त्यामुळे चेसींना मागणी वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गाजवळील हरिकाका कंपाऊंडमध्ये चेसींचे काम सुरू झाले आहे.
देखाव्यांसाठी ट्रॅक्टर चेसींचा वापर
शहरातील शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. त्यामुळे ही चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून शिवभक्त दाखल होत असतात. त्याचबरोबर देखावे उत्कृष्टरीत्या सादर करण्यासाठी मंडळांची धडपड सुरू झाली आहे. देखावे ओपन चेसीवर सादर केले जातात. त्यामुळे ट्रक आणि ट्रॅक्टरच्या चेसी बुक केल्या जात आहेत. विविध मंडळे वेगवेगळ्या ठिकाणी चेसी बुक करीत आहेत. त्यामुळे ओपन ट्रक आणि ट्रॅक्टरच्या चेसींना मागणी वाढू लागली आहे. शहर आणि उपनगरांतील विविध मंडळे शिवरायांच्या जीवनातील तेजोमय घटनांवर जिवंत देखावे सादर करणार आहेत. शहरातील विविध चौकांमध्ये हे प्रसंग साकारले जाणार आहेत. यासाठी ट्रक आणि ट्रॅक्टरच्या चेसींचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे चेसी तयार करणाऱ्या गांधीनगर येथील ट्रक बांधणी कारखान्यात मंडळांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढू लागली आहे. दरवर्षी चित्ररथ मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
वेषभूषेला प्राधान्य
केवळ एक दिवसावर चित्ररथ मिरवणूक आल्याने कलाकारांच्या सरावाला वेग आला आहे. सायंकाळच्या वेळेत सरावावर अधिक भर दिला जात आहे. सादरीकरण उत्कृष्ट व्हावे, यासाठी पेहरावाला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे पेहराव, ढाल-तलवार, जिरेटोप, दांडपट्टा आदी साहित्याचे बुकिंग केले जात आहे. त्याचबरोबर भगव्या टोप्या, फेटे आणि भगव्या झेंड्यांनाही मागणी वाढू लागली आहे. शहरात शनिवारी सायंकाळी 64 हून अधिक मंडळे सादरीकरण सादर करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि कलाकारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती, अफझलखान, औरंगजेब आणि इतर शिवकालीन पात्रे सादर करण्यासाठी कलाकारांची धडपड सुरू झाली आहे. एकूणच चित्ररथ मिरवणुकीसाठी शिवभक्तांच्या तयारीला वेग आला आहे. चित्ररथ मिरवणुकीसाठी शहरासह विनायकनगर, नेहरूनगर, शाहूनगर, कॅम्प, सह्याद्रीनगर आदी परिसरातील मंडळांचा सहभाग असणार आहे. काही गावांमध्ये चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. वैभवशाली चित्ररथ मिरवणुकीसाठी परराज्यांतील शिवभक्तांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे.
ढोलताशा, ध्वजपथकाचे आकर्षण
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत ढोलताशा आणि ध्वजपथकांचेही मोठे आकर्षण असते. तरुण-तरुणी सहभागी होऊन अतिशय सुरेख वादन करतात. त्यामुळे मिरवणुकीतील ढोलताशा आणि ध्वजपथके पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. कोरोनानंतर यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीत ढोलताशांचा आवाज घुमणार आहे. त्यामुळे ढोलताशा पथकांचीही तयारी सुरू झाली आहे.