भाजप प्रदेशाध्यक्ष मजूमदार जखमी : तृणमूल नेत्यांकडून महिलांचे शोषण
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे तृणमूल नेत्यांकडून झालेले अनेक महिलांचे लैंगिक शोषण तसेच जमीन बळकाविण्याच्या प्रकाराच्या विरोधात राजकीय वातावरण तापले आहे. संदेशखाली येथील घटनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली आहे. या झटापटीत भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार जखमी झाले आहेत. जखमी मजूमदार यांना बशीरहाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बंगाल पोलिसांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील अशांत संदेशखाली येथे जाण्यापासून रोखण्यासाठी घेरल्याचा आरोप मजूमदार यांनी जखमी होण्यापूर्वी केला होता. मजूमदार यांनी निदर्शकांची भेट घेण्यासाठी संदेशखाली येथे जाण्याची घोषणा केली होती.
पोलिसांकडून रोखण्यात आल्यावर मजूमदार यांनी इचामती नदीच्या काठावर सरस्वती पूजा केली. यानंतरही सुकांत मजूमदार हे संदेशखाली येथे जाण्यावर ठाम राहिल्याने पोलिसांसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. यादरम्यान पोलिसांसोबत झालेल्या झटापटीदरम्यान मजूमदार हे जखमी झाले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गंभीर जखमी झाल्याचे कळताच भाजप कार्यकर्ते संतापले होते. यामुण्s पोलिसांनी त्वरित मजूमदार यांना वाहनात बसवून बशीरहाट येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
संदेशखाली येथील अनेक महिलांचे तृणमूल नेत्यांनी लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तृणमूल नेत्यांनी या महिलांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्यावर अत्याचार केले आहेत. तसेच येथील लोकांच्या जमिनी हडपल्या आहेत. अत्याचाराला बळी पडलेल्या महिला आता संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेस विरोधात अनेक दिवसांपासून निदर्शने करत आहेत. यामुळे राज्यातील ममता बॅनर्जी सरकार अडचणीत आले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणात अनेक तृणमूल नेत्यांचा हात असल्याचा आरोप आहे.