मनपाच्या कचरावाहू वाहन चालकांची व्यथा : मागील 9 महिन्यांपासून वेतनापासून वंचित : कर्मचारी भीतीच्या छायेखाली
बेळगाव : महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे गेल्या 6 ते 9 महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. याबाबत अनेकवेळा आंदोलन केले. आंदोलन करताना हे कर्मचारी भीतीच्या छायेखालीच होते. कारण आंदोलन केल्यानंतर आपणाला कामावरून कमी करणार नाहीत ना? अशी भीती त्यांच्या मनामध्ये आहे. इतके महिने वेतन नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जीवन जगणे मेटाकुटीचे बनले आहे. याकडे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी लक्ष देणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सध्याच्या महागाईमध्ये जीवन जगणे कठीण झाले आहे. याचबरोबर कामही मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे सध्या काम करत असलेल्या ठिकाणी जर आंदोलन केले तर कामावरून कमी केल्यानंतर आणखीनच गंभीर परिस्थिती उद्भवेल अशी भीती या चालकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. वेतन नाही, खिशात एक पैसाही नाही, घरात अन्नही नाही. तरीदेखील दबावाखाली हे कर्मचारी काम करत आहेत. जर आंदोलन केले तर आम्हाला कामावरून कमी करतील, अशी भीती त्यांच्या मनामध्ये घर करून आहे.
आम्ही जगायचे कसे?
अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन मिळाले नाही तर आगपाखड होते. मात्र या चालकांना 9 महिन्यांपासून वेतन नाही. त्यामुळे त्यांनी काय करायचे? याचा थोडा तरी विचार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहाटे उठायचे, कचरा भरून वाहने चालवायची. मात्र पोटाला नाही त्यामुळे आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न हे कर्मचारी करत आहेत. आतापर्यंत तीनवेळा आंदोलन केले. मात्र केवळ आश्वासन देण्यात आले आहे. उद्या वेतन जमा करू, असे सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात पुन्हा पदरी निराशाच पडते. यामुळे हे वाहनचालक अक्षरश: खचले आहेत.
आजच्या सर्वसाधारण सभेकडे चालकांचे लक्ष
शनिवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे. त्या बैठकीमध्ये या वाहन चालकांच्या वेतनाबाबत चर्चा होणार का? याकडे या चालकांचे लक्ष लागले आहे. शनिवार दि. 7 रोजी आम्हाला वेतन देतो, असे आश्वासन दिले आहे. त्या दिवशी तरी आम्हाला वेतन मिळेल का? याकडे त्यांच्या नजरा आहेत. जर वेतन मिळाले नाही तर पुन्हा या वाहनचालकांना आंदोलनाचे अस्त्र उपसावे लागणार आहे. याकडे आता महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.