प्रतिनिधी/ बेळगाव
धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी बेळगावमधील शिवप्रतिष्ठानचे धारकरी शनिवारी सकाळी सांगलीला रवाना झाले. यानिमित्त धर्मवीर संभाजी चौक येथील संभाजी महाराजाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धारकरी वाहनांनी सांगलीला रवाना झाले. वाहनाचे पूजन जिल्हा प्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील महिनाभरापासून धर्मवीर बलिदान मास शहरासह ग्रामीण भागात पाळला जात आहे. आपल्या घराच्या परिसरातील मंदिरांमध्ये, सूचना फलकांजवळ, घरोघरी पूजन केले जात आहेत. बलिदान मास संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने बेळगावचे धारकरी सांगली येथील वढू बुद्रुक येथे धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी शनिवारी रवाना झाले.
धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख किरण गावडे म्हणाले, 25 फेब्रुवारीपासून बलिदान मास पाळला जात आहे. शनिवारी धारकरी सांगलीला रवाना झाले असून रविवारी सकाळी धर्मवीर ज्वाला सकाळी 7.00 वा. धर्मवीर संभाजी चौकात येणार आहे. दुपारी 4 नंतर बेळगाव तसेच गोवा येथील धारकरी आपापल्या गावांमध्ये ही ज्वाला नेणार आहेत. मंगळवार दि. 21 रोजी शहरात सकाळी 6.30 वा. मूक पदयात्रा काढली जाणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने हिंदूबांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
धारकरी वाहनांनी वढू बुद्रूक येथे गेले असून रविवारी ते परतणार आहेत. यानिमित्त वाहनांचे पूजन करून धारकरी रवाना झाले. यावेळी विभाग प्रमुख, तालुका प्रमुख व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.