कर्नाटक, गुजरातसाठी नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त होणार : भाजपकडून मोठ्या बदलाची तयारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीकरता भाजपने तयारींना वेग दिला आहे. याचनुसार भाजप लवकरच संघटनात्मक बदल करणार आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांना नवी जबाबदारी मिळू शकते. याचबरोबर गुजरात-कर्नाटक समवेत तीन राज्यांमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष जाहीर केले जाऊ शकतात.
भाजपमधील बदलांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा आणि भाजप महासचिव बी. एल. संतोष यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. सध्या या बदलांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोहोर उमटविण्यात आलेली नाही. परंतु 30 जूननंतर कधीही या बदलांची घोषणा होऊ शकते असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मंत्रिमंडळातही बदल शक्य
याचबरोबर मोदी मंत्रिमंडळात देखील फेरबदल होण्याची शक्यता आहे. हा फेरबदल संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होऊ शकतो. पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदविषयक मंत्रिमंडळाच्या समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या तारखांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक होणार आहे.