पूर्ण काँग्रेस विजयच्या हाती जाण्याची भीती : सावधपणे केली युरी आलेमावांची नियुक्ती
विशेष प्रतिनिधी /पणजी
गोवा फॉरवर्ड पक्षाचे (जीएफपी) काँगेसमध्ये विसर्जन करुन काँग्रेस मजबूत करण्याची अनेकांची कल्पना असली तरी काँग्रेसकडून तसा प्रस्ताव अजून जीएफपीकडे पोहोचलेला नाही, तरी दुसऱया बाजूने काँग्रेसने पक्षाचे नेतृत्व किंवा संपूर्ण पक्षच विजय सरदेसाईंकडे जाईल, या भीतीने युरी आलेमाव यांची अगोदरच विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली आहे. सरदेसाई यांनी सांगितले की विसर्जनाची चर्चा वाऱयावर नव्हे, कारण हा विषय गंभीर आहे, मात्र काँग्रेस खरोखरच किती गंभीर आहे हे पहावे लागेल आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आल्याशिवाय आपण त्यावर भाष्य तरी कशाला करायचे? असा सवाल केला आहे.
विजय सरदेसाई यांच्यात विरोधी पक्षनेता बनण्याची धमक व ताकद आहे मात्र काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱयांना विजय सरदेसाई हे संपूर्ण गोव्यातील काँग्रेस पक्ष ताब्यात घेतील, याची भीती वाटत असल्याने पक्षाचे भवितव्य काहीही असो सध्यातरी विजय सरदेसाई यांना पक्षात घेऊन पक्ष विस्तारण्याचे सोडून दिले आहे. नव्यानेच निवडून आलेले युरी आलेमाव हे काँग्रेस विधिमंडळाचे नेतृत्व करतील, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे.
विरोधात केवळ सात आमदार
सध्या गोवा विधानसभेत विरोधी पक्षांकडे केवळ 7 आमदार आहेत. काँग्रेसचे त्यात 3 आमदार असून या तिघांपैकी युरी आलेमाव यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली परंतु त्यांना विरोधी पक्षनेतेपद देणार काय? हा प्रश्न आहे. विधिमंडळ कामकाज नियमानुसार किमान एक दशमांश म्हणजेच किमान 10 टक्के आमदार असतील, तरच त्या पक्षाच्या विधिमंडळ नेत्याला विरोधी पक्षनेतेपद बहाल करता येईल.
… तर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद
विधिमंडळात काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरतो मात्र विरोधी पक्ष नेतेपदासाठी किमान 4 आमदार आवश्यक असतात. काँग्रेसकडे तीनच आमदार आहेत. विजय सरदेसाई यांना पक्षात घेण्याबाबत काँग्रेसने कोणतीही चर्चा केलेली नाही. विजय जर काँग्रेसमध्ये गेले असते तर काँग्रेसचे 4 आमदार झाले असते त्यामुळे या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यास कोणी आक्षेप घेऊ शकत नाही.
मंदिरात, देवासमोर शपथ घेण्यावर बंदी घाला
दिगंबर कामत यांच्यासह ज्यांनी ज्यांनी मंदिरात व इतर धार्मिक स्थळांवर जाऊन पक्षातून फुटणार नाही अशा ज्या शपथा घेतल्या व नंतर जनतेचा व देवाचाही विश्वासघात केला अशा नेत्यांना मंदिरात बंदी घातली पाहिजे. तसेच देवा धर्माचा वापर राजकीयदृष्टय़ा करणाऱयांना तसा वापर करण्यास मंदिर व्यवस्थापनांनी बंदी घालण्याची मागणी गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी केली. मंदिरांची विश्वासार्हता अशा राजकारण्यांमुळे धोक्यात येतेय. राज्यातील जनता देवाला मानते. त्यांची देवाप्रती भावना आहे, जनतेमध्ये भावार्थ आहे. देवाची चेष्टा करणाऱयांना जनता व देवही गप्प बसणार नाही, त्यांना योग्य तो धडा मिळणारच, असे विजय सरदेसाई म्हणाले.
काँग्रेस मरणासन्न अवस्थेत : सरदेसाई
विजय सरदेसाई म्हणाले की काँग्रेसच्या 8 आमदारांनी पक्षांतर केल्याने काँग्रेसची अवस्था मरणासन्न झालेली आहे. गोव्यात इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांचा इरादा भाजपला आव्हान देण्यासाठी वा भाजपला संपविण्यासाठी नाही, तर काँग्रेस पक्षाची जी जागा होती, जे स्थान होते ती जागा पटकावण्यासाठी ही मंडळी वावरत आहे.
काँग्रेसच्या टाळूवरील लोणी खाण्यासाठी टपलेलो नाही
काँग्रेसच्या मरणासन्न अवस्थेत आपण काही ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्यासाठी टपलेला नाही’. माझा स्वतंत्र पक्ष आहे व तो स्वभिमानी आहे. जनतेच्या विचारांशी आपण बांधिल आहे. काँग्रेसचे आमदार वारंवार फुटतात याबद्दल जनतेत प्रचंड संताप आहे. काँग्रेस पक्षामध्ये आपण जाणे म्हणजे काँग्रेसला मोठे करण्यासारखे आहे. ज्यांना गोव्याच्या भवितव्याची चिंता आहे ते नेते गोवा फॉरवर्ड व काँग्रेस एकत्रित आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही सरदेसाई म्हणाले.
काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी आमदार युरी आलेमाव
काँग्रेस विधिमंडळ गटनेते म्हणून पुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्षीय गट नेतेपदाचा वाद त्यामुळे संपुष्टात आला आहे.
आलेमाव यांची विधानसभेतील एकंदरीत कामगिरी पाहून हे पद त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी दिली. काँग्रेसचे इतर दोन आमदार कार्लुस फरेरा आणि एल्टन डिकॉस्ता यांनी आलेमाव यांच्या नियुक्तीचे स्वागत केले असून आनंद व्यक्त केला आहे. युरी आलेमाव हे माजी आमदार- माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांचे पुत्र असून विद्यार्थी दशेपासून विविध चळवळीत व राजकारणात आहेत. त्यांच्या विधानसभेतील कामगीरीची काँगेससह सत्ताधारी आमदारांनी देखील स्तुती केली होती.