चिखली नाक्यावर लागला वॅलकाम टू संभाजीनगरचा फलक, वादात भर
प्रतिनिधी /वास्को
वास्कोत नामकरणाचा मुद्दा पुन्हा जोर पकडू लागला आहे. चिखलीतील शिवस्मारकाच्या समोरच ‘वॅलकाम टू संभाजीनगर’ असा फलक उभारण्यात आलेला असून हा फलक वादाचा विषय ठरलेला आहे. सामाजीक माध्यमांवरही वास्कोच्या नामकरणाचा विषय गाजत आहे. नामकरणाच्या समर्थनात आणि विरोधातही प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.
वास्को शहराच्या नामकरणाचा विषय दर काही वर्षांनी उपस्थित होत असतो. गोवा मुक्तीपासूनच नामकरणाची मागणी होत आलेली आहे. मात्र, ही मागणी परीपूर्ण झालेली नाही. संभाजीनगर असे नामकरण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या राजवटीत झाले होते. त्याची नोंद गोव्यात आणि केंद्र सरकारातही आहे. मात्र, गोव्यात आणि गोव्याबाहेरही वास्को द गामा याच प्रचलीत नावाचा जास्तीत जास्त वापर होत गेला. त्यामुळे संभाजीनगर विस्मरणात गेले. मात्र, अधूनमधून वास्को द गामा या नावाविरूध्द राष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकांकडून टीका होत असते. संभाजीनगर या नावाच्या वापराचीही मागणी होत असते. 1997-98 च्या काळात नामांतराच्या मागणीने जोर धरला होता. त्यानंतर हा विषय सुप्त राहिला. दहा वर्षांपूर्वी नागरी पुरवठा खात्याच्या रेशन कार्डवरही संभाजीनगर असे नाव छापले गेल्याने वाद उफाळून आला होता. त्यानंतर पुन्हा या विषयावर शांतताच राहिली. परंतु गेल्या काही वर्षांपासून पुन्हा वास्को द गामाविरूध्द नाराजी व्यक्त होऊ लागलेली आहे. दोन दिवसांपासून तर हा विषय बराच उफाळून आलेला आहे.
चिखलीच्या नाक्यावर लागला वॅलकाम टू संभाजीनगर असा फलक
दहा दिवसांपूर्वी चिखलीतील नाक्यावर शिवस्मारक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. या समारोहात वास्को द गामा ऐवजी संभाजीनगर याच नावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे संभाजीनगराची चर्चा पुन्हा सुरू झाली होती. दोन दिवसांपूर्वी कुणी तरी शिवस्मारकासमोरच्या जागेत वॅलकाम टू संभाजीनगर असा ठळक दिसणारा फलक उभारलेला आहे. हा फलक सध्या वादाचा विषय ठरलेला आहे. चर्चेलाही ऊत आलेला आहे. ही चर्चा आता सामाजीक माध्यमांवरही पसरली आहे. संभाजीनगरचे काही जण समर्थन करीत आहेत तर काही लोक संभाजीनगर या नावाच्या वापराला विरोध करीत आहेत.
संभाजीनगरचा वापर होण्यास कसलीच हरकत नाही
मुरगावचे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे नेते दीपक नाईक यांनी संभाजीनगर हे नाव वापरण्यास गैर काहीच नसल्याचे स्पष्ट केले. अलाहबादचे प्रयागराज होऊ शकते तर वास्कोचे संभाजीनगर का होऊ शकत नाही असा प्रश्न त्यांनी केला. लोकांची ती भावना आहे. दुसऱया बाजुने वास्को बाबतही भावना आहे. परंतु या प्रश्नावर सामंजस्य व्हायला हवे. कायदय़ाने जर संभाजीनगर असेल आणि त्याचा वापर झाला तर आपल्याला समाधान वाटेल असे मत दीपक नाईक यांनी व्यक्त केले.
नामकरणापेक्षा विकासाचा विषय महत्वाचा
मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी मात्र, शहराच्या नावाचा विषय महत्वाचा नसलयाचे स्पष्ट करून सध्या विकासाचा विषय महत्वाचा असल्याचे सांगितले. या विषयावर चर्चाच नको. विकासाच्या विषयावर चर्चा व्हायला हवी असे ते म्हणाले.
वास्को द गामा च कायम राहायला हवे
माजी महसुलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलीप यांनी संभाजीनगर असा नामफलक नाक्यावर लावणे हा चुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले. वास्को द गामा या नावाने सर्व काही चांगले चालत असेल तर दुसऱया नावाची गरजच काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वास्को द गामाच कायम राहायला हवे. आपण दोन वेळा वास्कोतूनच निवडून आलो होतो. परंतु असे काही करण्याचा प्रयत्न कधी गेला नव्हता असे ते म्हणाले.
फलकाच्या प्रकाराला जास्त महत्व देता कामा नये
मुरगावचे नगरसेवक फॅड्रीक हेन्रीक्स यांच्या मते लोकांमध्ये वाद निर्माण करू पाहणाऱया अवघ्याच काही लोकांनी संभाजीनगरचा फलक लावलेला आहे. त्याला जास्त महत्व देता कामा नये. तो अनधिकृत प्रशासनाने किंवा स्थानिक पंचायतीने तो फलक हटवायला हवा. अन्यथा लोकच तो काढतील. वास्को द गामाचे नामकरण करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता. यापूर्वीही इतिहास चाळला गेला होता. आता पुन्हा इतिहास चाळण्यास हरकत नाही असे फॅड्रीक हेन्रीक्स म्हणाले.
संभाजीनगर फलकाविरूध्द प्रशासनाने कारवाई करावी
प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नझीर खान यांच्या मते जुना इतिहास उगाळत बसून वास्को द गामा ला विरोध करण्याची गरज नाही. शहराचे नाव वास्को आहे व वास्कोच राहिल. संभाजीनगर नामफलक लावण्याच्या प्रकाराचा आपण निषेध करीत आहे. जिल्हा प्रशासन किंवा चिखली पंचायतीने या प्रकाराविरूध्द कारवाई करायला हवी.