वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस सिलिंडर वाटप व आयुष्मान भारत कार्ड वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला. नेताजी गल्ली येथे आयोजिलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. माजी सदस्य कल्लाप्पा जाधव होते.
व्यासपीठावर खासदार मंगला अंगडी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनय कदम, नेते मारुती अष्टगी, ग्रा. पं. माजी सदस्या अर्चना पाटील, मराठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शंकर कोनेरी, कुद्रेमनी ग्रा. पं. माजी अध्यक्ष संजय पाटील, ग्रा. पं. सदस्य दादासाहेब भद्दरगडे, प्रदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते, निरंजन जाधव, श्रीशैल देसाई आदी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी 80 लाभार्थींना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील मोफत गॅस सिलिंडर आणि 250 लाभार्थींना आयुष्मान भारत कार्डांचे वाटप करण्यात आले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नारायण झंगरुचे यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविलेल्या अनेक योजनांची माहिती दिली.
अर्चना पाटील यांच्या हस्ते खासदार मंगला अंगडी यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कल्लाप्पा जाधव, निरंजन जाधव व कार्यकर्त्यांच्या हस्ते इतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मराठी शाळा बांधकामाला अधिकाधिक निधी देण्याचे आवाहन
मराठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शंकर कोनेरी व बांधकाम कमिटीचे सदस्य निरंजन जाधव यांनी ग्रामस्थांतर्फे जिल्ह्याधिकाऱ्यांना जीर्ण झालेल्या शाळा इमारतीचे बांधकाम पाडण्यास मंजुरी मिळावी याकरिता निवेदन दिल्याचे खासदारांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी खासदार अंगडी यांनी सहकार्य करण्याचे सांगून शाळा बांधकामासाठी केंद्राकडूनही जास्तीतजास्त निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बाळू पाटील, राजू हुद्दार, बसवंत चव्हाण, महादेव हुद्दार, रामा पाटील, प्रवीण कोनेरी, नितीन चव्हाण, किरण चव्हाण, संतोष चव्हाण, कल्लाप्पा निलजकर, सिद्राय पाटील, गुंडू जाधव, राजू चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण झंगरुचे यांनी सूत्रसंचालन केले. तर शंकर कोनेरी यांनी आभार मानले.