महापालिका निवडणूक तयारी संदर्भात होणार चर्चा; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह खासदार, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या जून महिन्यान राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हय़ासह शहरातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. कोल्हापूर महापालिकेत भाजप आणि शिंदे गट अर्थात बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात युती होणार हे उघड आहे. दरम्यान, महापालिकेची निवडणूक डिसेंबर नंतर होण्याची शक्यता जरी असली तरी भाजप आणि शिंदे गट यांच्याकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक तयारीचा भाग म्हणून येत्या दिवाळीच्या दरम्यान, दोन पक्षांच्या नेते आणि पदाधिकाऱयांची बैठक होणार आहे. भाजप नेते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
कोल्हापूर महापालिकेवर गेली दोन वर्षे प्रशासक आहे. निवडणूक कधी होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. इच्छुक उमेदवारांनी याआधी दोन तीन वेळा निवडणूक होणार म्हणून तयारी केली होती. पण दरवेळी एक का बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयावरून बदल झाले. राज्यात जूनमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवे सरकार, नवी धोरणे याचा प्रभावही निवडणुकांवर पडला आहे. दरम्यान, पूर्वी शिवसेना महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर होती. आता या शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट निर्माण झाल्यानंतर महापालिका निवडणुकीत शिंदे गट भाजपच्या साथीने लढणार आहे. शिंदे गटाचे नेतृत्व सध्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर करत आहेत. त्यांनीही शिंदे गटाच्या अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. भाजपचे बुथ लेव्हल मॅनेजमेंट सुरू आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ सोमवारी कोल्हापूर दौऱयावर होते. त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून महापालिकेवर कमळ फुलविण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले होते. भाजपला खासदार धनंजय महाडिक यांच्या रूपाने महाडिक गटाची ताकद मिळणार आहे. सध्या निवडणूक जरी दूर असली तरी भाजपकडून चाचपणी सुरू आहे. तयारीचा भाग म्हणून येत्या दिवाळीच्या काळात मंत्री चंद्रकांतदादा पाटील चार पाच दिवस कोल्हापूरमध्ये येणार आहेत. यावेळी भाजप आणि शिंदे गटाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीला खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशिल माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबीटकर उपस्थिती राहणार आहेत.