सिव्हिल लॉ विषयावर लिहिला प्रबंध : विविध देशांच्या अनेक पदव्यांचे मानकरी
प्रतिनिधी /बेळगाव
येथील ज्येष्ट वकील एस. बी. शेख यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यांनी ‘सिव्हिल लॉ’मध्ये प्रबंध लिहिला होता. त्यानंतर त्यांना डॉक्टरेट देण्यात आली आहे.
3 सप्टेंबर रोजी हरियाणा येथील हॉटेल लीला ऍम्बिन्सीस येथे झालेल्या भव्य कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना डॉक्टरेटचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मेवार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. एस. राणा, गुरगांव येथील स्टारेक्स विद्यापीठाचे कुलगुरू सरदार मोहींदर सिंग, इस्लामिक रिपब्लिक अफगाणीस्तानचे इम्बॅसीस कादीर शहा, मालवीचे लिओनॉर्ड मेंझी, केनियाचे पॅट्रिक ऑडिंबो यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ट वकील शेख यांना यापूर्वीही अनेक डॉक्टरेट मिळाल्या आहेत. जीओ टेक्नॉलॉजीकल ओपन युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट ही पदवी 2018 साली दिली होती. त्यानंतर राष्ट्रीय शांतता विद्यापीठ जर्मनीच्यावतीने डॉक्टरेट देण्यात आली आहे. अर्जेंटिना येथील पाऊल्स युनिव्हर्सिटीने दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट दिली होती. पुन्हा आणखी एक मानाची अशी कॅलिफोर्निया विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट देण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे बेळगाव जिल्हा न्यायालयाबरोबरच उच्च न्यायालयात त्यांनी सेवा बजावली आहे. याचबरोबर तब्बल 30 हून अधिक बँकांवर ते सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. 20 वर्षे बी. व्ही. बेल्लद लॉ कॉलेजमध्ये ज्येष्ट लेक्चरर म्हणून काम पाहिले आहे. कायद्याची 16 पुस्तके लिहिली आहेत. वकिली क्षेत्रामध्ये त्यांचा गाढा अभ्यास आहे. विद्यार्थ्यांना तसेच वकिली पेशामध्ये नव्याने काम करण्यासाठी आलेल्या वकिलांना मार्गदर्शन देण्यासाठी त्यांनी विविध पुस्तके प्रकाशित केली आहेत.
वकिली सेवा बजावत असताना अनेक समस्या निर्माण होतात. त्या सोडवत त्यांनी विविध प्रकारच्या कायद्यांचा अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत, ती वकिलांना मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्याकडे कोणीही कायद्यासंदर्भात माहिती किंवा मदत, विचारविनिमय करण्यासाठी गेले असता ते सर्व काम बाजूला ठेवून मार्गदर्शन करत असतात. केवळ पेशा म्हणून न थांबता समाजासाठी आणि या क्षेत्रात प्रवेश करणाऱया तरुणांसाठी काही तरी केले पाहिजे, याची तळमळ त्यांना आहे. अनेक सेवाभावी संस्थांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल आणि डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचे वकील क्षेत्राबरोबरच बेळगाववासीयांतून कौतुक होत आहे.