ऑस्ट्रेलिया विजयी, भारताला दिशाहीन, स्वैर गोलंदाजीबरोबरच खराब क्षेत्ररक्षणाचाही फटका
मोहाली / वृत्तसंस्था
कॅमेरॉन ग्रीन (30 चेंडूत 61) व मॅथ्यू वेड (21 चेंडूत नाबाद 45) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने येथील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 4 गडी राखून धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने पंडय़ाच्या 30 चेंडूतील 71 धावांच्या नाबाद खेळीमुळे 20 षटकात 6 बाद 208 धावांचा डोंगर जरुर रचला. पण, ऑस्ट्रेलियानेही चोख प्रत्युत्तर देत 19.2 षटकात 6 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 209 धावांचे कडवे आव्हान असताना ऑस्ट्रेलियाने देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आणि आघाडीचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना देखील षटकामागे दहा धावांची सरासरी कायम राहील, याची काटेकोर दक्षता घेतली. भारताचे खराब क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या पथ्यावर पडत राहिले.
प्रारंभी, कर्णधार ऍरॉन फिंच (13 चेंडूत 22) व कॅमेरॉन ग्रीन (30 चेंडूत 61) यांनी 3.3 षटकात 39 धावांची सलामी दिली तर तिसऱया स्थानावरील स्टीव्ह स्मिथने 24 चेंडूत 35 धावांची जलद खेळी साकारली. स्टीव्ह स्मिथने यष्टीमागे झेलबाद असतानाही क्रीझवर थांबत जणू रक्तात भिनलेली अखिलाडूवृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली तर ग्लेन मॅक्सवेल देखील उमेश यादवच्या गोलंदाजीवर कार्तिककडेच झेल देत तंबूत परतला. आश्चर्य म्हणजे या निकालासाठीही भारताला डीआरएस घ्यावा लागला.
अक्षर पटेलने जोश इंग्लिसचा त्रिफळा उडवला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाची 14.1 षटकात 5 बाद 145 अशी स्थिती होती. मात्र, त्यानंतर अचानक भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन्सना मनमुराद फटकेबाजीची मुभाच दिली आणि त्यांनी या संधीचा लाभ घेत सहज विजय मिळवला नसता तरच नवल होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताला सर्वाधिक धावा जरुर दिल्या. पण, 4 गडय़ांनी विजय संपादन करत त्याचा हिशेब देखील याच लढतीत चुकता केला. उभय संघातील दुसरा सामना आता दि. 23 रोजी होईल.
राहुल, हार्दिक यांची अर्धशतके
प्रारंभी, केएल राहुल व हार्दिक पंडय़ा यांच्या जोरदार स्ट्रोकप्लेच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकात 6 बाद 208 धावांचा डोंगर रचला. आपला स्ट्राईकरेट रडारखाली असणाऱया केएल राहुलने अवघ्या 35 चेंडूत 55 धावांची आतषबाजी केली तर हार्दिक पंडय़ाचा झंझावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सैरभैर करुन गेला. सूर्यकुमार यादवने देखील 25 चेंडूत जलद 46 धावा फटकावल्या.
डय़ू फॅक्टर महत्त्वाचा ठरेल, असा अंदाज बांधत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम डेव्हिडला पदार्पणाची संधी दिली. पाठदुखीतून सावरलेल्या जसप्रित बुमराहला भारताने या पहिल्या लढतीसाठी उतरवले नाही, ते आश्चर्याचे ठरले. रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला पसंती देण्यात आली.
उमेश यादवने येथे 3 वर्षांनंतर आपला पहिलाच सामना खेळला तर वर्ल्डकपसाठी संघात जागा मिळण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱया दीपक चहरला राखीव खेळाडूत बसवण्यात आले.
रोहित शर्मा व विराट कोहली अतिशय स्वस्तात बाद झाल्यानंतर राहुल व सूर्यकुमार यादव यांनी 42 चेंडूत जलद 68 धावा फटकावल्या. हे दोघेही फलंदाज क्रीझवर असताना षटकारांची आतषबाजी सहजपणे होत राहिली. राहुलने जोश हॅझलवूडला सहजपणे फटकावत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. नंतर त्याने कॅमेरुन ग्रीनला डीप स्क्वेअर लेगला उत्तुंग षटकारासाठी भिरकावले होते.
सूर्यकुमारची अनोखी फलंदाजी शैली पुन्हा एकदा लक्षवेधी ठरली. मोहालीत उपस्थित चाहत्यांचे उत्तम मनोरंजन करताना त्याने आपल्या भात्यातील एकापेक्षा एक फटक्यांचा जणू नजराणाच सादर केला. पॅट कमिन्सला त्याने फाईन लेगला खेचलेला षटकार निव्वळ लक्षवेधी होता. सूर्यकुमारने ऍडम झाम्पाला लाँग ऑन व डीपमिडविकेटकडे सलग दोन षटकार खेचले.
त्यानंतर हार्दिक पंडय़ाने खेळाची सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली आणि त्याच्या झंझावातामुळे भारताने पाहता पाहता द्विशतक फलकावर लावले. त्याने 18 व्या षटकात कमिन्सची उत्तम धुलाई केली आणि त्यानंतर डावातील शेवटच्या षटकात ग्रीनला सलग 3 षटकारांसाठी पिटाळून लावले. भारताने शेवटच्या 5 षटकात 67 धावांची आतषबाजी केली.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 20 षटकात 6 बाद 208 (केएल राहुल 35 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 55, सूर्यकुमार यादव 25 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह 46, हार्दिक पंडय़ा 30 चेंडूत 7 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 71, रोहित शर्मा 9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 11. नॅथन इलिस 4 षटकात 3-30, हॅझलवूड 4 षटकात 2-39, कॅमेरुन ग्रीन 1-46).
ऑस्ट्रेलिया ः 19.2 षटकात 6 बाद 211 (कॅमेरॉन ग्रीन 30 चेंडूत 8 चौकार, 4 षटकारांसह 61, मॅथ्यू वेड 21 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 45, स्टीव्ह स्मिथ 35, ऍरॉन फिंच 22. भुवनेश्वर 4 षटकात 0-52, अक्षर पटेल 4 षटकात 3-17, उमेश यादव 2-27, चहल 3.2 षटकात 1-42).
हार्दिक पंडय़ाचा 30 चेंडूत 71 धावांचा झंझावात, शेवटच्या 3 चेंडूत 3 षटकार!
जागतिक स्तरावरील कोणत्याही गोलंदाजी लाईनअपचा उत्तम समाचार घेण्याची निर्विवाद क्षमता असलेल्या विस्फोटक फलंदाज हार्दिक पंडय़ाने अवघ्या 30 चेंडूत नाबाद 71 धावांची आतषबाजी करत आपला फॉर्म आणखी अधोरेखित केला. त्याच्या या तुफानी खेळीत 7 चौकार, 5 षटकारांचा समावेश राहिला. यात, डावातील शेवटच्या 3 चेंडूवर 3 षटकार खेचत पंडय़ाने डेथ ओव्हर्समधील आपली हुकूमत दाखवून दिली. या षटकातील चौथा चेंडू डीप मिडविकेटकडे, पाचवा चेंडू लाँगऑफकडे तर सहावा चेंडू डीप थर्डवरुन षटकारासाठी फटकावण्याचा पराक्रम त्याने गाजवला.
हर्षलच्या एकाच षटकात 22 धावांची आतषबाजी अन् सामना फिरला!
शेवटच्या 3 षटकात 40 धावांची आवश्यकता असताना डावखुऱया मॅथ्यू वेडने हर्षलच्या षटकात तब्बल 3 षटकार फटकावले आणि एकूण 22 धावा वसूल केल्या. वेडने पहिला चेंडू डीप फाईन लेगकडे, तिसरा चेंडू डीप मिडविकेटकडे तर पाचवा चेंडू डीप स्क्वेअर लेगकडे षटकारासाठी पिटाळला होता. उर्वरित 2 षटकात 18 धावांचे संरक्षण करण्याचे आव्हान असताना रोहितने भुवनेश्वरकडे चेंडू सोपवला. पण, भुवनेश्वरही 3 चौकारांसह तब्बल 16 धावा देत महागडा ठरला. शेवटच्या षटकात 2 धावांची आवश्यकता असताना टिम डेव्हिडने पंडय़ाकडे सोपा झेल दिला. पण, एव्हाना हा सामना भारताच्या हातातून निसटला होता. पुढे दुसऱया चेंडूवर कमिन्सने कव्हर-पॉईंटमधून अलगद चौकार वसूल केला आणि कांगारुंच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब झाले.