प्रतिनिधी / कुंकळ्ळी
कुंकळ्ळीचे प्रख्यात डॉक्टर सतीश कृष्ण फळदेसाई (वय 57) यांचे अल्पआजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्याचदिवशी सायंकाळी अण्णे, बाळळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी तनुजा (काणकोणातील मल्लिकार्जुन कॉलेजच्या प्राध्यापिका), पुत्र डॉ. साईराज व कन्या ओजस्वी, भाऊ प्रशांत, भावजय हेमा व अन्य असा मोठा परिवार आहे.
डॉ. फळदेसाई हे शालेय दशेपासून एक हुशार विद्यार्थी म्हणून गणले गेले होते. त्यांचे शिक्षण असोळणा येथील एमपीएस हायस्कूलमध्ये झाले. शालान्त परीक्षेत त्यांनी बोर्डात 15 वा क्रमांक मिळवून आपली चमक दाखवली होती. त्यांनी पुढील शिक्षण मडगावच्या चौगुले कॉलेजमध्ये पूर्ण केले व पणजीतील गोवा मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली. नंतर मुंबईत त्यांनी अन्य शिक्षण घेतले व मुंबईहून ते गोव्यात येऊन रेड क्रॉस संस्थेत रूजू झाले. तेथे दोन वर्षे त्यांनी सेवा दिली व नंतर कुंकळ्ळीत स्वतःचा दवाखाना सुरू केला. मध्यंतरी कुंकळ्ळी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलून डॉ. फळदेसाई यांची या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
एका मृदुभाषी व अचूक निदान करून रुग्णांना दिलासा देणारे डॉक्टर म्हणून फळदेसाई यांनी अल्पावधीत नावलौकिक मिळविला होता. अनेक परिवारांचे फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांची ओळख बनली होती. ते कमी बोलणारे, पण एक दिलदार व सरळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. सामाजिक व धार्मिक क्षेत्रांतील अनेक संस्थांना त्यांचे सहकार्य लाभले. डॉ. फळदेसाई यांना क्षत्रिय मराठा समाजातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. अन्य संस्थांनीही त्यांचा गौरव केला होता. बाळ्ळी सरकारी हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघावर त्यांना कायम स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आले होते. त्यांची जन्मभूमी बाळ्ळी, तर कुंकळ्ळी कर्मभूमी होती. डॉ. फळदेसाई यांच्या दवाखान्यात रुग्णांची नेहमीच गर्दी असायची आणि न कंटाळता ते सगळ्यांना दिलासा द्यायचे. लोक एका चांगल्या सेवाभावी डॉक्टरला, तर त्यांचे मित्रगण एका सच्च्या मित्राला मुकले आहेत, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मडगाव पालिका मुख्याधिकारी रोहित कदम, रॉयल हॉस्पिटलचे प्रख्यात डॉ. राजेश्वर नाईक, ईएसआय-मडगावचे डॉ. विश्वजित फळदेसाई, वाहतूक सहसंचालक संदीप देसाई, सरकारी अधिकारी दीपक देसाई तसेच गोवाभरातील त्यांच्या हितचिंतकांनी व चाहत्यांनी निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.