शिवाजी विद्यापीठातील सैफ डीएसटी सेंटरचे समन्वयक डॉ. आर. जी. सोनकवडे यांचे प्रतिपादन : दैनिक तरूण भारतला सदिच्छा भेट
प्रतिनिधी/कोल्हापूर
इंधन, विद्युत निर्मितीत सध्या भारत मागे आहे, हे खरे असले तरी सोलार आणि इलेक्ट्रिक बाईक हे त्यावर उत्तम पर्याय बनला आहे. परंतू इंधन, इलेक्ट्रीकल, तंत्रज्ञान, उद्योक सर्वच क्षेत्रात भारताला उज्वल भविष्य आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील सैफ डीएसटीसेंटरचे समन्वयक डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी केले.
दैनिक तरूण भारतला मंगळवारी डॉ. सोनकवडे यांनी सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान तरूण भारत प्रतिनिधींशी चर्चा करताना ते बोलत होते. दैनिक तरूण भारत कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
डॉ. सोनकवडे म्हणाले, देशाच्या विकासात शास्त्रज्ञांचे मोलाचे योगदान आहे. कोरोना कालावधीतही शास्त्रज्ञांनी संशोधन करून लस तयार करीत अनेकांना जीवदान दिले. तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेले पूरक मनुष्यबळ तयार करण्याची प्रक्रिया देभर सुरू आहे. भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय प्रायोजित शिवाजी विद्यापीठातील सैफ डीएसटी सेंटरमध्ये अत्याधुनिक 14 उपकरणे आहेत. या उपकरणामध्ये कोणत्याही संशोधनाचा नमुना (सँपल) चाचणी करता येते. यापुर्वी नमुना चाचणीसाठी कोरियाला जावे लागत होते. आता विद्यापीठातील सैफ सेंटरमध्येच सर्व प्रकारच्या नमुण्यांची चाचणी करता येते. दिल्ली, हरियाणा, आंध्रप्रदेश, श्रीनगर, गुजरात देशातील आदी राज्य व परदेशातील संशोधक आणि फौंड्री कंपन्या या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून सँपल चाचणी करीत आहेत. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. या शुल्कातून सहा महिन्यात सेंटरला दहा लाखाचा फायदा झाला आहे. भविष्यात सरकारचे अनुदान बंद झाल्यानंतर सैफ सेंटर स्वतःसर्व खर्च करण्यासाठी सक्षम बनेल याची मला खात्री आहे. तंत्रज्ञानाच्या युगात संशोधक विद्यार्थ्यांनी देश आणि समाजोपयोगी संशोधन केले पाहिजे, असा सल्ला डॉ. सोनकवडे यांनी दिला. यावेळी तरूण भारतचे प्रशासन अधिकारी राहूल शिंदे, विशेष प्रतिनिधी सुधाकर काशिद, उपमुख्यप्रतिनिधी संतोष पाटील आदी उपस्थित होते.