जपान सरकारचे नागरिकांना आवाहन
मद्यप्राशन आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे वैद्यकीय शास्त्र म्हणते. परंतु याउलट जपान सरकार मात्र तरुणाईला अधिक मद्यप्राशनासाठी प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे याकरता देशव्यापी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. जपानमध्ये मद्यप्राशनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेक व्हिवा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले. तरुण-तरुणींना मद्यप्राशनासाठी प्रोत्साहित करण्याकरता नॅशनल एनटीएमार्फत हे मोठे अभियान चालविले जात आहे.
या स्पर्धेत 20-39 वयोगटातील तरुण-तरुणी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेच्या अंतर्गत तरुण-तरुणींना त्यांच्या पिढीत मद्यप्राशनाचे प्रमाण कसे वाढवता येईल हे सांगावे लागेल. या र्स्पोत जाहिरात, ब्रँडिंगसह अत्याधुनिक योजनांवरही रणनीति तयार करावी लागणार आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या वापराला प्राधान्य देण्यात येणार आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
जपानमधील तरुणपिढी त्यांच्या पालकांच्या तुलनेत कमी प्रमाणात मद्यप्राशन करत असल्याने जपान सरकारला हे पाऊल उचलावे लागले आहे. कमी मद्यप्राशनाचा जपानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय. मद्यपानाचे प्रमाण घटल्याने साक (तांदळपासून तयार करण्यात आलेल्या मद्याचा एक प्रकार) सारख्या पेयांवर मिळणाऱया कराच्या संकलनाचे प्रमाण कमी झाले आहे.
जपान सरकारकडून आयोजित या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात येतील. तरुणाईने अधिकाधिक मद्यप्राशन केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा सरकारचा विचार आहे. मद्यप्राशनाकडे तरुणाईचा उदासीन दृष्टीकोन जपानमधील मद्याचे सेवन कमी होण्यामागील मुख्य कारण आहे. जपानमधील तरुणाई मद्यप्राशनाकडे फारसे लक्ष देत नाही. यामुळे जपानमधील वाईन मार्केट कमी होत आहे.
जपानमधील 1995 मधील मद्याचे दरडोई सेवन 100 लिटरवरून 2020 मध्ये 75 लिटरवर आले आहे. जपानमध्ये मद्यावर 5 टक्के कर आहे. एकूण कर महसूल 2011 मध्ये 3 टक्के तर 2020 मध्ये अधिक घसरून 1.7 टक्क्यांवर आला.