राजकीय कुटुंबात जन्माला आल्यामुळे आपल्याला घराणेशाहीपासून दूर पळता येऊ शकत नाही तसेच शरद पवार यांची मुलगी असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे मत राष्ट्रवादीच्या नूतन कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या कामगिरीकडे लोकांनी लक्ष दिले पाहीजे कारण संपुर्ण संसद आपले वडील शरद पवार चालवत नसल्याचेही त्या म्हणाल्या.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या घराणेशाहीच्या टिकेवर म्हणाल्या, “होय, ही घराणेशाहीच आहे. माझा जन्म ज्या घरात झाला, त्याचा सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार याची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आरोप करणाऱ्यांनी जरूर करावे. घराणेशाहीच्या आरोपापासून मी दूर जाऊ शकत नाही.” असेही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्यांनी, “विरोधकांनी माझी संसदेची कामगिरी बघितली पाहीजे. संसद माझे एकटे वडील, काका किंवा माझी आई चालवत नाही. पण माझी लोकसभेतील आकडेवारीवरून माझी कामगिरी चांगली असल्याचे दिसून येते. या कामगिरीच्या चार्टमध्ये मी शीर्षस्थानी असून यात घराणेशाहीचे कोणतेही राजकारण नाही. ते गुणवत्तेवर आहे. तुम्ही माझ्या किंवा कोणाविरुद्धही घराणेशाहीचा आरोप करू शकत नाही,” असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २४ व्या वर्धापनदिनी पक्षाच्या कार्यकारणीत मोठे बदल केले आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे.