जिल्हाधिकाऱ्यांनी दिली अधिकाऱ्यांना माहिती
बेळगाव : ज्यांना मतदान केंद्रांवर येवून मतदान करता येत नाही, अशा 80 वर्षांवरील वृद्ध व दिव्यांगांसाठी टपालाने मतदान करता येणार आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी टपाल मतदान, मतपत्रिका वितरण आदीविषयी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. यावेळी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेविषयी माहिती दिली. एकदा टपाल मतपत्रिका घेतलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रांवर मतदान करता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 80 वर्षांवरील वृद्ध व दिव्यांगांसाठी ही सुविधा ऐच्छिक आहे. यासाठी नावे नोंदविल्यानंतर अधिकारी संबंधितांच्या घरी भेट देतात. या पथकात दोन मतदान अधिकारी, मायक्रो ऑब्झर्वर, पोलीस अधिकारी, छायाचित्रकार असे पाच जणांचे हे पथक असणार आहे. पात्र मतदारांना त्यांच्या मागणीवरून मतदानासाठी मतपत्रिका पुरविण्यात येणार आहे.
टपाल मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी नावे नोंदविणाऱ्यांच्या घरी भेट देण्यापूर्वी त्यांना आधीच तारीख कळविली जाते. त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठविला जातो. त्यानंतर त्या-त्या मतदारसंघनिहाय अधिकाऱ्यांची पथके घरांना भेटी देतात. निवडणूक आयोगाच्या मार्गसुचीनुसार ओळखपत्र व इतर कागदपत्रांची पडताळणी करून मतदानासाठी संधी दिली जाते. मतदानानंतर अधिकारी मतपत्रिका एका लिफाफ्यात बंद करून सुरक्षित ठेवणार आहेत. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत मतमोजणी केंद्रांवर ते पाठविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया मतदानाच्या दहा दिवस आधी सुरू करून मतदानाच्या आदल्यादिवशी पूर्ण करायची आहे. मतदारांमध्ये यासंबंधी जागृती होणार आहे. टपाल मतपत्रिकेविषयी गुप्तता बाळगण्यासाठी सूचना केल्या जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण होणार आहे. टपाल मतपत्रिकेचे वितरण, मतदान व ते जमा करण्यासंबंधी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना केली.