अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी इलेक्टोरल बाँडप्रकरणी मोठी टिप्पणी केली आहे. हा केवळ देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
इलेक्टोरल बाँडचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे माझे मानणे आहे. भाजपची लढाई विरोधी पक्षांशी नव्हे तर या मुद्द्यामुळे खरी लढाई भाजप आणि भारताच्या लोकांदरम्यान होताना दिसून येणार असल्याचे माझे मानणे असल्याचे परकला प्रभाकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
इलेक्टोरल बाँडशी निगडित प्रकरण आताच्या तुलनेत पुढील काळात अधिक जोर पकडणार आहे. हा मुद्दा वेगाने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहे. हा भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे आता प्रत्येकाला समजू लागले आहे. अशा स्थितीत या मुद्द्यामुळे या सरकारला मतदारांकडून कठोर शिक्षा दिली जाईल असे मला वाटते असे उद्गार त्यांनी काढले आहेत. परकला प्रभाकर यांना मोदी सरकारविरोधी म्हणूनच ओळखले जाते. प्रभाकर यांचे कुटुंब हे काँग्रेसशी संबंधित राहिले आहे.