नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टेल्सा कंपनीचे प्रमुख एलोन मस्क यांच्याकडून होणारी ट्विटर या कंपनीची खरेदी काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. स्वतः मस्क यांनीच ही माहिती दिली. यामुळे ट्विटरच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. ट्विटरवर मोठय़ा प्रमाणात बनावट आणि खोटी खाती उघण्यात आली आहेत. त्यासंबंधीच्या मुद्दय़ाचे निराकरण होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्विटरने आपल्या विवरणपत्रात या खात्यांची आकडेवारी दिली असून अशी खाती 5 टक्क्यांहून कमी असल्याची माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विटर खरेदी करताना अशी खाती काढून टाकली जातील असे आश्वासन दिले होते. त्याच प्रमाणे ट्विटरला मिळणाऱया जाहीरातींचा मुद्दाही महत्वाचा आहे. ट्विटरच्या भविष्यकालीन योजना आणि धोरण यासंबंधीही मोठी अनिश्चितता असल्याचे ट्विटरच्या विवरणपत्रातून स्पष्ट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रस्तावित खरेदी तात्पुरती थांबविण्याचा निर्णय मस्क यांनी घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.
2 अधिकारी सोडून जाणार
ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग अग्रवाल यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार ट्विटरचे दोन महत्वाचे अधिकारी कंपनी सोडून जाणार आहेत. ते ग्राहक आणि उत्पन्न विभाग हे मुख्य अधिकारी सांभाळत होते. त्यांचे सोडून जाणे हा कंपनीला एक मोठा धक्का मानण्यात येत आहे. या माहितीचाही परिणाम कंपनीच्या समभागांवर झाला आहे. 2013 च्या अखेरीपर्यंत 7.5 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न आणि 31.3 कोटी दैनंदिन उपयोगकर्ते निर्माण करण्याचे ध्येय कंपनीने ठेवले होते. तथापि काही दिवसांपूर्वी हे ध्येय मागे घेण्यात आले होते. तसेच कर्मचाऱयांची भरती करण्याची योजनाही थांबविण्यात आली होती. या सर्व घडामोडींचा परिणाम ट्विटरची खरेदी लांबण्यात झाला आहे.