वार्ताहर /काकती
होनगा माळरानातील परिसरात विविध पिकांतून कोळपणीच्या कामांची धांदल उडाली आहे. भात व नाचणा रोपलागवड अंतिम टप्प्यात आली असून येत्या आठवडाभरात पूर्ण होणार आहे.
होनगा परिसरातील जमिनीमध्ये जूनच्या दुसऱया आठवडय़ात भात पेरणी झाली होती. ही पेरणी माळरानावरील मडीहोळ, हेग्गेरी आदी भागात होऊन पहिली कोळपणीची कामे पूर्ण झाली आहेत. भातरोप लागवडीचे 80 टक्के काम झाले असून येत्या आठवडय़ात भातरोप लागवड पूर्ण होणार आहे. होनग्यात उसाचे क्षेत्र वाढत आहे. 800 एकरात सध्या भातपीक तर बेन्नाळीत 100 एकरात भातरोप लागवड पूर्ण झाली आहे.
होनगा माळरानात 70 एकरात मका पीक असून भुईमूग पीक 20 एकरात व रताळीची 10 एकरात लागवड झाली आहे. सध्या या पिकांची स्थिती उत्तम असून पावसाची उघडीप मिळत असल्याने कोळपणीच्या कामांना जोर आला आहे. होनगा परिसरातील जुमनाळ, ईरणभावी, बबनट्टी, हळ्ळेहोसूर, व्हसाहोसूर आदी भागात कापसाचे पीक मोठय़ा प्रमाणात असून मृग नक्षत्रात पाऊस समाधानकारक झाला नसल्याने पिकांची उगवणही योग्य प्रकारे झाली नाही. यामुळे पुन्हा टोकण करून बियाणे रुजविण्यात आले. काही भागात कापसाचे पीक उत्तम असून सोयाबीन पिकाकडे शेतकरीवर्गाने लक्ष दिले आहे. त्यामुळे यंदा बटाटा लागवडीत घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मका पीक क्षेत्रात घट झाली आहे. याचे कारण म्हणजे सुरुवातीपासूनच कीड व रोगराईला मका पीक बळी पडत आहे. भुईमूग, सोयाबीन पिकांची वाढ जोमदार होत असून सायकल कोळपणी, कोडाविडर, बैलजोडीने कोळपणीच्या कामांना जोर आला आहे.
कोळपणीची कामे पार पडलेल्या क्षेत्रात पहिल्या खुरपणीची कामे शेवटच्या टप्यात आहेत. पावसानंतर उघडीप असा निसर्गाचा खेळ सुरू आहे. परिणामी या पिकांना सध्या पोषक वातावरण मिळाले असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे.