आयएएस अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत पाळीव श्वानाला फिरविण्यासाठी पूर्ण स्टेडियम रिकामी करविणाऱ्या आयएएस अधिकारी रिंकू दुग्गा यांना सरकारने अनिवार्य स्वरुपात सेवानिवृत्ती घ्यायला लावली आहे.
रिंकू दुग्गा या 1994 च्या तुकडीच्या एजीएमयूटी कॅडरच्या अधिकारी होत्या. रिंकू दुग्गा यांना अरुणाचल प्रदेशात मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. रिंकू यांचे पती संजीव खिरवा देखील 1994 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून ते सध्या लडाखमध्ये नियुक्त आहेत.
रिंकू दुग्गा यांना त्यांच्या सेवा रिकॉर्डच्या मूल्यांकनानंतर अनिवार्य सेवानिवृत्त करण्यात येणार आहे. दुग्गा यांना मौलिक नियम (एफआर) 56 (जे), केंद्रीय नागरी सेवा (सीसीएस) पेन्शन नियम, 1972 च्या नियम 48 अंतर्गत सक्तीची सेवानिवृत्ती पत्करण्यास सांगण्यात येणार आहे. सरकारला कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त करण्याचा अधिकार आहे.
श्वानासाठी पूर्ण स्टेडियम रिकामी करविण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यावर रिंकू दुग्गा आणि संजीव खिरवा यांची दिल्लीतून बदली करण्यात आली होती. दोन्ही अधिकाऱ्यांवर स्वत:च्या पदाचा गैरवापर करण्याचा आरोप झाला होता. दिल्लीत नियुक्त असताना आयएएस दांपत्य संजीव खिरवा आणि त्यांच्या पत्नी रिंकू दुग्गा यांना पाळीव श्वानाला फिरविण्यासाठी अॅथलिट्सना स्टेडियममधून बाहेर काढले हेते. हा प्रकार वारंवार घडत असल्याने सराव करणाऱ्या अॅथलिट्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.