कनिष्ठ न्यायालयात सुनावणी चालणार : हस्तक्षेप करण्यास नकार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थान आणि शाही मशिदीजवळील अतिक्रमण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. याप्रसंगी खंडपीठाने अतिक्रमण आणि तोडफोडीबाबत अधिक हस्तक्षेप करण्यास नकार देत खटल्याची सुनावणी बंद केली. आता फक्त कनिष्ठ न्यायालयात नुकसान भरपाई आणि पुनर्वसनावर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने बुलडोझरची कारवाईसंबंधीची सुनावणी पुढे न चालू ठेवता बंद केली.
नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाच्या मागण्यांबाबत कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित खटल्याच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी आपले मत मांडावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच गुणवत्तेच्या आधारावर सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने मथुरा जिल्हा न्यायालयाला दिले. सर्वोच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट रोजी मागील सुनावणीदरम्यान बुलडोझरच्या कारवाईला स्थगिती दिली होती. आता न्यायालयाने स्थगितीचा कालावधी वाढवण्यास नकार दिला.