वृत्तसंस्था/ लंडन
2023 च्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रेकेट स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यातील अंतिम सुपर लिग सिरीजचे यजमानपद इंग्लंड भूषविणार आहे. ही सिरीज येत्या मे महिन्यात खेळवली जाणार आहे.
भारतात होणाऱया या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वनडे सांघिक मानांकनातील पहिल्या आठ क्रमांकावरील संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. मात्र इतर संघांच्या प्रवेशाकरिता पात्र फेरी स्पर्धा घेतली जाणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि लंका या दोन संघांच्या अनुक्रमे नेदरलँडस् आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील निकालावर आयर्लंडचे सुपरलिग स्पर्धेतील भवितव्य अवलंबून राहिल. मार्चमध्ये लंका आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामने खेळवले जाणार आहेत. लंकेने ही मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे आयर्लंडने या सुपर लिग मालिकेत बांगलादेशचा 3-0 असा पराभव केला तर आयर्लंड संघाला 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे तिकीट मिळू शकेल. आयर्लंडने अशी कामगिरी केली तर त्यांना झिंबाब्वेत जून-जुलै दरम्यान होणाऱया पात्र फेरीची स्पर्धा खेळावी लागणार नाही. दरम्यान दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडस्चा 2-0 तसेच आयर्लंडने बांगलादेशचा 3-0 अशा फरकाने पराभव केल्यास या दोन्ही संघांचे गुण समान होतील. आणि त्यानंतर सरस रनरेटवर पात्रतेचा संघ निश्चित होईल. सध्या गुणतक्त्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ आयर्लंडपेक्षा एका गुणाने आघाडीवर आहे. आयर्लंडचा नेट रनरेट -0.382 असा आहे. त्यांचा रनरेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा थोडा अधिक चांगला आहे. दक्षिण आफ्रिकेचा रनरेट -0.410 असा आहे. येत्या मार्च-एप्रिल दरम्यान होणाऱया नेदरलँडस् विरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला आपला रनरेट सुधारण्याची संधी मिळणार आहे.
येत्या मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱया आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यातील महत्त्वाच्या सुपरलिग मालिकेवेळी इंग्लंडमध्ये वास्तव्य असलेल्या बांगलादेश क्रिकेट समर्थकांकडून बांगलादेश संघाला निश्चितच प्रोत्साहन मिळू शकेल. 2019 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश संघाला इंग्लंडमध्ये सर्वच विभागातून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. 2010 नंतर इंग्लंडने बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील मालिकेचे यजमानपद भूषविलेले नाही.