6-2 गोलफरकाने मात, साकाचे दोन गोल
वृत्तसंस्था/ दोहा
येथील खलिफा स्टेडियमवर झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील गट ब मधील साखळी सामन्यात इंग्लंडने इराणवर 6-2 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवित तीन गुण वसूल केले. बुकायो साकाने दोन गोल नोंदवत या विजयात मोलाची भूमिका बजावली तर इराणचे दोन्ही गोल तारेमीने केले.
साकाव्यतिरिक्त ज्युड बेलिंगहॅम, रहीम स्टर्लिंग, मार्कस रॅशफोर्ड व जॅक ग्रीलिश यांनी इंग्लंडचे अन्य गोल केले. एखाद्या प्रमुख स्पर्धेत पाच किंवा त्याहून अधिक गोल करण्याची इंग्लंडची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2018 वर्ल्ड कपमध्ये पनामाविरुद्ध त्यांनी 6-1 असा विजय मिळवित हा पराक्रम पहिल्यांदा केला होता. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस गॅरेथ साऊदगेट त्यांचे प्रशिक्षक होते. इंग्लंडने प्रत्येक सत्रात तीन गोल नोंदवत इराणची बचावफळी उघडी पाडली. मेहदी तारेमीने इराणचे दोन्ही गोल नोंदवले.
स्पर्धेतील या दुसऱया सामन्यातही व्हीएआरचा अवलंब करण्यात आला. त्याचा लाभ इराणला पेनल्टी मिळण्यात झाला. शर्ट ओढल्याच्या कारणावरून त्यांना ही पेनल्टी मिळाली आणि अखेरच्या क्षणात त्यावर तारेमीने अचूक गोल नोंदवला. इराणमध्ये सध्या हिजाबविरोधात सरकारविरुद्ध आंदोलन सुरू असून त्याचा प्रभाव या सामन्यातही दिसून आला. या आंदोलकर्त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी इराणच्या खेळाडूंनी सामना सुरू होण्याआधी राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला.
या सामन्याआधी इंग्लंडला मागील सहा सामन्यात एकही विजय मिळविता आला नव्हता. पण या सामन्यात त्यांनी पूर्वार्धात शानदार प्रदर्शन केले आणि बेलिंगहॅमने इंग्लंडसाठी पहिला गोल नोंदवला. साकाने नंतर ही आघाडी वाढविली स्टर्लिंगने तिसरा गोल नोंदवला. उत्तरार्धात साकाने वैयक्तिक दुसरा गोल केल्यानंतर इंग्लंड संघ थोडा मंदावला. त्याचा लाभ घेत इराणने पहिला गोल नोंदवला. मेहदी तारेमीने हा गोल केला. पण नंतर बदली खेळाडू रॅशफोर्ड, ग्रीलिश यांनी आणखी दोन गोल नोंदवत इराणवरील मोठा विजय निश्चित केला. पूर्वार्धात 14 मिनिटांचा वाढीव इंज्युरी टाईम मिळाला तर उत्तरार्धात दहा मिनिटांचा स्टॉपेज टाईम मिळाला.
पहिल्या सत्रात 20 मिनिटांचा खेळ झाला तेव्हा इराणचा गोलरक्षक अलिरेझा बैरनवांदला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. आपल्याच सहकाऱयाशी चेंडू अडविताना एकमेकांची डोकी आदळल्याने तो बराच वेळ खाली पडला होता. गोलरक्षक बदलल्याचा इंग्लंडनेही नंतर फायदा उठविला.
35 व्या मिनिटाला बेलिंगहॅमने डाव्या बगलेतून ल्युक शॉकडून आलेल्या क्रॉसला हेडरवर गोलजाळय़ाची अचूक दिशा देत इंग्लंडला आघाडीवर नेले. दुसऱया गोलसाठीही शॉनेच चेंडू पुरविला. त्याच्या कॉर्नरवर हॅरी मॅग्वायरने हेडरने साकाकडे चेंडू पुरविला, त्याने तो टॉप कॉर्नरवर व्हॉली करीत गोल नोंदवला. 45 व्या मिनिटाला स्टर्लिंगने तिसरा गोल नोंदवत इंग्लंडची बाजू आणखी भक्कम केली. बेलिंगहॅमने चेंडू पुरविल्यानंतर हॅरी केनच्या क्रॉसवर त्याने चेंडूला जाळय़ात टोलवले. 62 व्या मिनिटाला साकाने वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल नोंदवला. स्टर्लिंगने यासाठी त्याला चेंडू पुरविला होता. यानंतर वाहिद अमिरीने पुरविलेल्या चेंडूवर तारेमीने इराणचा पहिला गोल नोंदवला. 70 व्या मिनिटाला रॅशफोर्डने इंग्लंडचा पाचवा गोल नोंदवला तर 90 व्या मिनिटाला ग्रीलिशने कॅलम विल्सनने उजवीकडून दिलेल्या क्रॉस पासवर संघाचा सहावा गोल नोंदवला. सामना संपण्यास काही क्षण असताना मिळालेल्या पेनल्टीवर तारेमीने इराणचा दुसरा गोल नोंदवला.
इंग्लंडचा दुसरा सामना शुक्रवारी अमेरिकेविरुद्ध तर 29 नोव्हेंबर रोजी गट ब मधील शेवटचा सामना वेल्सविरुद्ध होईल.