मंत्री सुभाष शिरोडकर यांचे उद्गार : कोडार बेताळ मंदिरचा जिर्णोद्धार
वार्ताहर / दाभाळ
गावातील मंदिरे ही श्रद्धा स्थानाबरोबरच संस्कृतीची वाहक आहेत. मंदिरांमुळेच गावपण व संस्कृती टिकून राहिली. पोर्तुगीजांच्या जुलुमी राजवटीतही गोव्यातील संस्कृती टिकून राहण्यासाठी मंदिरांचे स्थान महत्त्वाचे होते. या धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखतानाच संस्कृतीचा समृद्ध वारसा टिकून राहण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जलसंवर्धन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
कोडार येथील सोमनाथ पंचायतनच्या श्री बेताळ मंदिरचा जिर्णोद्धार, नूतन मूर्ती प्रतिष्ठापना व शिखर कलशारोहण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बेताळ मंदिरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते स्मरणिका प्रकाशन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उद्योजक दीपक गावकर, सरपंच उमेश गावडे, पंचसदस्य विद्या गावकर, अक्षय गावकर, वास्तुविशारद नवनीत आर्सेकर, सोमनाथ देवस्थानचे अध्यक्ष सच्चित गावकर आदी उपस्थित होते.
देवस्थान समिती व कोडार वासियांनी एकसंघ राहून मंदिराचे पुर्नबांधकाम अवघ्या काही महिन्यात करून जीर्णाद्धार केल्याबद्दल मंत्री सुभाष शिरोडकर यांनी देवस्थान समिती व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. दीपक गावकर म्हणाले, मंदिरामुळे गावची अस्मिता टिकून राहते. त्यासाठी जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे. मंदिरामुळे गावात एकजूट राहते, तसेच संस्कृतीचे संवर्धन होत असते, असे सरपंच उमेश गावडे म्हणाले. विद्या गावकर, सच्चित गावकर यांचीही यावेळी भाषणे झाली. मंदिरच्या पुर्नबांधणीसाठी निधी उभारण्यासाठी काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. आचार्य नारायण बोरकर, ग्रामपुरोहित राजेंद्र देसाई, वास्तुविशारद नवनीत आर्सेकर, मंदिराचे कोषाध्यक्ष संतोष गावकर, कंत्राटदार इम्तियाज मुल्ला यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिर्णोद्धारानिमित्त तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांना स्मृतीचिन्हे देऊन गौरविण्यात आले. संतोष गावकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत गावकर यांनी मंदिर बांधकामाविषयी आढावा घेतला. सुरेंद्र गावकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप प्रभूगावकर यांनी तर विश्राम गावकर यांनी आभार मानले.