जगदीश शेट्टर यांचे रामदुर्गमध्ये आवाहन : मोठे मताधिक्य मिळण्याचा विश्वास
बेळगाव : लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राज्याची नसून देशाची आहे. देशाच्या रक्षणासाठी, सनातन धर्म टिकविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 जागांचे लक्ष्य निश्चित केले आहे. सूरतमधील एक मतदारसंघ बिनविरोध झाल्याने आता 399 जागांची भाजपला आवश्यकता आहे. रामदुर्ग तालुक्यातून शेट्टर यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास रामदुर्गचे भाजप नेते चिक्करेवण्णा यांनी व्यक्त केला. शनिवारी रात्री रामदुर्ग शहरात झालेल्या जाहीर सभेवेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले, मी संपूर्ण मतदारसंघात प्रचारदौरा केला. जनतेचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून मोदींचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कारंजी मठाधीशांचा आशीर्वाद
भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी रविवारी कारंजी मठाला भेट दिली. गुरुसिद्ध महास्वामी व इतर मठाधीशांचा त्यांनी आशीर्वाद घेतला. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी होईल, असा आशीर्वाद स्वामीजींनी दिला. यावेळी कित्तूर येथील मठाधीश, होसूर येथील मडिवाळेश्वर मठाचे मठाधीश, अंकलगी मठ, मुक्ती मठ यासह इतर मठांचे मठाधीश उपस्थित होते. यावेळी आमदार रमेश जारकीहोळी, डॉ. के. व्ही. पाटील, दियप्पा बेळवडी, निंगाप्पा मण्णीकेरी, इराण्णा हरनट्टी यासह इतर उपस्थित होते.