कोळसा घोटाळाप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा झटका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील कोळसा खाणीच्या वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. विशेष न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी कोळसा मंत्रालयाचे माजी सहसचिव के. एस. क्रोफा यांनाही दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला. या दोघांच्या वैयक्तिक शिक्षेसोबतच न्यायालयाने दोषी कंपनी ग्रेस इंडस्ट्रीज लिमिटेडचे (जीआयएल) संचालक मुकेश गुप्ता यांना गुन्हेगारी कट आणि फसवणूक केल्याप्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावत 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. त्याचबरोबर कंपनीला दोन लाख रुपयांचा वेगळा दंड भरण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
लोहारा पूर्व कोळसा खाणीच्या वाटपाशी संबंधित प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने दोघांनाही गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले होते. एच. सी. गुप्ता यांना यापूर्वी कोळसा घोटाळय़ाच्या तीन प्रकरणांमध्येही दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणांमध्ये गुप्ता यांनी शिक्षेविरोधात दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गुप्ता हे सध्या तुरुंगात आहेत. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननुसार (सीबीआय), 2005 ते 2011 दरम्यान आरोपींनी भारत सरकारविरोधात गुन्हेगारी कट रचला होता. कंपनीने त्यांच्या अर्जात एकूण उत्पन्न 120 कोटी रुपयांचा दावा केला होता. मात्र, तिचे एकूण उत्पन्न 3.3 कोटी रुपये असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.