मुख्यमंत्री सावंत, मंत्री फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष तानावडे, सभापती तवडकर यांच्यासहित भाजपाच्या अन्य आमदारांचा सत्कार
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण भाजप मंडळ आणि काणकोण नागरिक समितीतर्फे चावडीवरील गायतोंडे मैदानावर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्पपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच भाजपाच्या अन्य काही आमदारांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री सावंत, प्रदेशाध्यक्ष तानावडे, समाजकल्याणमंत्री फळदेसाई, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष असलेले सावर्डेचे आमदार गणेश गावकर, एसजीपीडीएचे अध्यक्ष असलेले वास्कोचे आमदार दाजी साळकर तसेच कदंब महामंडळाचे अध्यक्ष असलेले नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांचा सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सभापती तवडकर यांचा सत्कार मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळय़ानिमित्त चावडीवरील बसस्थानक ते शेळेरपर्यंतच्या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेल्या भाजपाच्या भगव्या ध्वजामुळे हा संपूर्ण परिसर जणू भाजपमय झाल्याचे चित्र या ठिकाणी निर्माण झाले होते. काणकोण भाजप मंडळाने या कार्यक्रमाची धुरा आपल्या अंगावर घेतली होती. काणकोण मतदारसंघातील विविध भागांतील मिळून 5 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. त्यात महिलांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता. त्यांच्यासाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काणकोण भाजप मंडळाचे पदाधिकारी आणि काणकोण नगरपालिका मंडळाचे नगरसेवक वावरताना दिसत होते. त्याचप्रमाणे पंचायत क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचा सहभागही मोठय़ा प्रमाणात दिसून आला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वरील मान्यवरांच्या खेरीज भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, अन्य पदाधिकारी, नगराध्यक्ष सायमन रिबेलो आणि अन्य नगरसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन सिद्धार्थ देसाई यांनी, तर स्वागत विशाल देसाई यांनी केले आणि विशांत गावकर यांनी आभार मानले.