नेरूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
कांदोळी : नेरूल येथील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी व विद्या प्रसारक संस्थेतर्फे नेरूल पंचायत सभागृहात योगासने व प्राणायामची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. प्रथम नेरूल पंचायत सरपंचा रेश्मा कळंगुटकर व उपसरपंच अविनाश शिरोडकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून योग दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
योगशिक्षिका श्रीमती शुभांगी कांदोळकर यांनी मानवतेसाठी योग शारीरिक व मानसिक आजारापासून दूर करण्यासाठी तसेच तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योग केल्याने कशी मदत होते याची माहिती यावेळी योग आसना करतेवेळी दिली. त्यानंतर अष्टांग योग, विविध आसने, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आदी योगासनाची प्रात्याक्षिके सादर केली. योग संकल्प करण्यात आला. प्रार्थना व शांती मंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
कोलवाळ पोलीस स्थानकात योगासन
म्हापसा : योग दिनाचे औचित्य साधून म्हापसा, हणजूण व कोलवाळ येथील पोलीस स्थानकात मोठय़ा उत्साहात योगदिन साजरा करण्यात आला. विभागीय पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली या पोलीस स्थानकामध्ये योगाचे धडे घेण्यात आले.
कोलवाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली दिक्षा फाऊंडेशनच्या सदस्य श्रीनिवास शिरोडकर यांनी योगाबद्दल धडे दिले. आमच्या जीवनात योगाचे महत्त्व काय? आणि योग का करावा याबद्दल माहिती दिली. बार्देश तालुक्यात उपविभागीय पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱया पोलीस स्थानकामध्ये योगदिनाचे आयोजन केल्याबद्दल उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सर्वांचे आभार मानले.
मंत्रवादी हायस्कूलात योगदिन उत्साहात
म्हापसा : म्हापसा येथील दत्ताराम मंत्रवादी मेमोरियल हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपाठीवर संस्थेचे अध्यक्ष मंगेश मंत्रवादी, मुख्याध्यापक शिवाजी मळीक उपस्थित होते. प्रारंभी हायस्कूलच्या गानवृंदाने योगगीत सादर केले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष मंगेश मंत्रवादी म्हणाले की, प्रसन्न मन व निरोगी शरीरासाठी योगाभ्यास अत्यंत आवश्यक आहे. योगासने व प्राणायाम यांचा नित्य सराव केला तर शरीर सुदृढ व मन एकाग्र व्हायला सहाय्य मिळते, असे सांगितले. मुख्याध्यापक शिवाजी मळीक यांनीही समयोचित विचार मांडले.
शिक्षिका देवेंद्र साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायाम प्रकारांचा अभ्यास केला. प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता नेवगी व शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी योगसत्रामध्ये सहभाग घेतला. शिक्षिका स्नेहा देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
‘चेतना’च्या शाळेतील दिव्यांग मुलांकडून योगदिन उत्साहात
कुडचडे : परमेश्वर आपल्या शरीरात वसलेला असतो आणि आपण आपल्या शरीराची व्यायामाद्वारे सेवा करणे गरजेचे आहे. योगसारख्या शारिरीक कसरतीला आपल्या जीवनात अत्यंत महत्त्व आहे, असे उद्गार कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे आर्थिक प्रमुख सुदेश नाईक यांनी काढले.
कुडचडे येथील चेतना एज्युकेशनल सोसायटीच्या शाळेच्या दिव्यांग मुलांनी मंगळवारी योगदिन साजरा केला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या बक्षिसवितरण सोहळय़ात ते बोलत होते. यावेळी चेतना सोसायटीचे अध्यक्ष राजू नायक, सचिव नंदेश वस्त, व्यवस्थापक वसंत सावंत, मुख्याध्यापिका रुबिया काकोडकर आणि योग शिक्षिका मिथिली काकोडकर उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात शाळेच्या दिव्यांग मुला-मुलींनी प्रभावीरीत्या योगासने करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी घेण्यात आलेल्या योग सादरीकरण स्पर्धेत कनि÷ गटात मुलांच्या विभागात पहिले बक्षीस आकाश गोवेकर, दुसरे निखर मकंदर, तिसरे हरिश नाईक, उत्तेजनार्थ प्रतीक गोवेकर, मुलींचा गटात पहिले स्लेविया वाझ, दुसरे दुर्वा वस्त, तिसरे ईश्वरी नाईक, उत्तेजनार्थ रिद्धी च्यारी, त्रिषा मिलिंद नाईक, त्रिषा तुकाराम नाईक, तर वरि÷ गटात पहिले प्रज्वल रायकर, दुसरे श्रेयांक पार्सेकर, तिसरे मुकीन शेख व उत्तेजनार्थ जुबलू पिशोत, एलरन गोम्स, शिवम नाईक, हनुमंत बैमनून याप्रमाणे बक्षिसे प्राप्त होऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सदर बक्षिसे प्रदान करण्यात आली. व्यवस्थापक सावंत यांनी प्रास्ताविक, तर शारीरिक शिक्षक सुधीर जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
फोंडा क्रीडा प्रकल्पमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात
फोंडा : राज्य सरकारच्या क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे आठवा आंतरराष्ट्रीय योगदिन फोंडा क्रीडा प्रकल्पच्या इनडोअर स्टेडियममध्ये साजरा करण्यात आला. यात अंदाजे 200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ‘मानवतेसाठी योग’ ही यावर्षीची संकल्पना होती.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडामंत्री गोविंद गावडे, क्रीडाखात्याचे संचालक तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणचे कार्यकारी संचालक अजय गावडे, योग गुरु जयवंत नाईक, फोंडय़ाचे एपीईओ निलिमा मयेकर तसेच विविध विद्यालयांचे शारीरिक शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते. आल्मेदा हायस्कूल, फातिमा हायस्कूल, सरकारी हायस्कूल सदर, डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूलचे विद्यार्थी, तायक्वांदो प्रशिक्षणार्थी व साई हॉस्टेलच्या प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते समई प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले योग ही ऋषी मुनींनी आम्हाला दिलेली देणगी आहे. योगाद्वारे निरोगी आरोग्य व बौद्धिक ज्ञान प्राप्त होते. जीवन आरोग्यमय व सुखमय होते. हे ज्ञान पुढील पिढीसाठी देणे आवश्यक आहे. तंदुरुस्त पिढी घडविणे आमचे ध्येय आहे. मानवतेसाठी योग ही यावर्षीची संकल्पना आहे. त्यामुळे माणूसकी जपणे हे आमचे कर्तव्य आहे. योगाभ्यास एकच दिवस न करता नियमित करावे असे आवाहन त्यांनी केले. योग गुरु जयवंत नाईक यांनी उपस्थितांना योग व प्राणायमाबद्दल मार्गदर्शन केले. हजारो वर्षांपूर्वी पंतजली ऋषींनी अष्टांग योगाची रचना केली. त्यात यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्यहार, धारणा, ध्यान व समाधी हे आठ प्रकार आहेत. योगासने व प्राणायमामुळे शरीर निरोगी होते तर मन आणि आत्मीय सुख मिळविण्यासाठी अष्टांग योगाची आवश्यकता असते असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध आसने व प्राणायमचे धडे दिले व त्याविषयी सविस्तर माहिती दिली.
स्वागत अजय गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलिमा मयेकर यांनी केले. तन्वेश वेंगुर्लेकर यांनी आभार मानले.
आरोग्य फायद्यासाठी योगाचा सराव करा- कार्लुस फरेरा
म्हापसा : लोकांनी योगा शिकून त्याचा सराव केवळ आरोग्यासाठीच केला पाहिजे असे नाही तर त्याचा प्रचार करून उपजीविकाही मिळवली पाहिजे. असे हळदोणचे आमदार कार्लुस फरेरा यांनी सांगितले.
मंगळवारी म्हापसा येथील पेडे क्रीडा संकुलात आयोजित आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. योगाच्या फायद्याबद्दल माहिती पसरवली पाहिजे. योगा ही भारतातील एक अतिशय प्राचीन प्रणाली आहे. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात आली आहे आणि भारत सरकारने तिचा प्रचार केला आहे. हे काहीतरी अद्भूत आहे कारण योगा याशिवाय आमची आरोग्य व्यवस्था सुधारणे, आम्हाला शिस्तीची भावना देखील शिकवते. शिस्त हे तुमचे यश असेल आणि त्यामुळे तुमचा गौरव होईल. तुमच्याकडे क्रीडा, कला, संस्कृती आणि अगदी शिक्षण ही शिस्त असेल तर ती तुम्हाला परिणाम साध्य करण्यात मदत करेल आणि कायम ठेवेल. तुम्ही पूर्ण आणि आनंदी जीवन जगत आहात. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना फरेरा म्हणाले.
योगा शिकवणे उदरनिर्वाहाचा मार्ग ठरू शकतो असेही ते म्हणाले. अनेक लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. योगा हे केवळ शास्त्र किंवा शिस्त नसून तो आता एक व्यवसाय बनत चालला आहे. आपण त्याचा फायदा का घेऊ नये? आणि त्याचा प्रचार करा. आमचे लोक योग शिकवून कमाई करू शकतात असेही ते पुढे म्हणाले. अशोक साळगावकर आणि संदीप मोरजकर यांनी योगा सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पेडे क्रीडा संकुलाचे प्रभारी सुनील गावस उपस्थित होते.
फातोर्डा भाजप मंडळा तर्फे योग दिवस साजरा
मडगाव : 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस फातोर्डा भाजप मंडळाने साजरा केला. योगदिन जगाच्या कानाकोपऱयात मोठय़ा प्रमाणात साजरा होत आहे. योगाचे महत्व आत्ता सर्वांना कळून चुकले आहे. दररोज योगा केल्याने अनेक आजार दूर ठेवता येतात तसेच निरोगी जीवन जगता येते असे मत यावेळी भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी व्यक्त केले.
योग गुरू दिलीप नाईक यांनी फातोर्डातील भाजपच्या कार्यकर्त्यांना विविध आसने शिकविली. योगा केवळ एका दिवसापुरता न करता, तो दररोज कराणे आवश्यक आहे. जर दररोज योगा केला तर त्याचा लाभ नक्कीच होईल असे दिलीप नाईक म्हणाले.
या योग दिनाच्या कार्यक्रमात फातोर्डा मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर, फातोर्डा महिला मोर्चाच्या अध्यक्ष तसेच मंडळाचे इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
82 वर्षीय योग शिक्षिकेची स्वस्तिक विद्यालयात प्रात्यक्षिके
फोंडा : प्रियोळ येथील स्वस्तिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. पतंजली योग समितीच्या योगशिक्षिका डॉ. अरुणा भदौरिया व हेमलता दिगंबर दिक्षित विद्यार्थ्यांना योगासंबंधी मार्गदर्शन केले. 82 वर्षीय हेमलता दिक्षित यांनी योगासनांची प्रात्याक्षिके सादर केली.
मुख्याध्यापक शिरीषकुमार आमशेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. योग हा आपल्या दिनक्रमाचा एक भाग बनला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यानी आत्तापासूनच नियमित योगासने, प्राणायम व सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. योगासाठी कुठलेच वय नसते. मन एकाग्र करुन नियमित योगा केल्यास त्याचा शरीर व मनःस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी फायदा होतो, असे हेमलता दिक्षित यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका त्रिशाला नाईक यांनी तर आरती जोग यांनी आभार मानले.