मळेकरणी एन. सी. सी. स्पोर्ट्स अकॅडमी, सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
उचगाव/ वार्ताहर
सैन्यदलामध्ये भरतीसाठी मध्यस्थी करून लाखो रुपये उकळणाऱया एजंटांच्या आहारी न जाता प्रामाणिकपणे नियमित व्यायाम आणि भरतीसाठी लागणारी मुख्य कौशल्ये जर मनापासून आत्मसात केली तर तुम्ही सहज सैन्यात भरती होऊ शकता. त्यासाठी कोणाही मध्यस्थाची गरज नाही, असे परखड विचार निवृत्त सुभेदार परशराम मरुचे यांनी व्यक्त केले.
उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित श्री मळेकरणी हायस्कूलमध्ये मळेकरणी एन. सी. सी. स्पोर्ट्स अकॅडमी, सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार, सन 2021-22 वर्षातील इयत्ता दहावीच्या वर्गातील उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून परशराम मरुचे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेपेटरी जवाहर देसाई हे होते.
प्रारंभी मुलींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उचगाव ग्रा. पं. उपाध्यक्षा मथुरा तेरसे यांनी सरस्वती फोटोपूजन केले. तर मळेकरणी एन. सी. सी. स्पोर्ट्स अकॅडमीचे उद्घाटन ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार, स्वा. सै. राजेंद्र कलघटगी, जवाहर देसाई व रोहिदास हांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी गणपती किटवाडकर, मिथिल जाधव, यल्लाप्पा हुंदरे, निखिल लाळगे, ओमकार पाटील, प्रकाश घुमटे, व्ही. एम. देसाई, शीतल कंग्राळकर, करण पाटील, एस. एच. चौगुले उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना ते म्हणाले, कोरोना काळात मुलांमध्ये एकप्रकारची मरगळ आलेली असून त्यांना अभ्यासाच्या प्रवाहात आणण्यासाठी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम अशा माध्यमांचा उपयोग करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये असे उपक्रम राबवावेत म्हणून आम्ही अकॅडमीचा शुभारंभ करत असल्याचे यावेळी सांगितले.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना निवृत्त हवालदार रोहिदास हांडे म्हणाले, सैन्यामध्ये भरतीसाठी म्हणून फक्त व्यायाम नाही तर आपल्या आरोग्यासाठी प्रथम व्यायाम हे ध्येय ठेवा. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा. त्यावेळी तुम्हाला यश नक्की मिळेल. अध्यक्षपदावरून बोलताना जवाहर देसाई म्हणाले, व्यायाम, आहार याची सांगड घालून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वीपणे वाटचाल करावी.
यावेळी आपल्या 32 वर्षांच्या अटेंडर म्हणून प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेले जी. के. तुप्पट यांचा यावेळी अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ आणि मळेकरणी हायस्कूलच्यावतीने शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश मिळविलेल्या अथर्व भरमा पावशे, साहिल सुरेश कंग्राळकर, आरती प्रकाश घुमटे, ऋतुजा राहुल केसरेकर या विद्यार्थ्यांना भेटवस्तू, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रतीक्षा भाट यांनी तर आभार प्रवीणा पवन देसाई यांनी मानले. या कार्यक्रमाला पालकवर्ग उपस्थित होता.