सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, व्हिडिओ शूटिंगही होणार
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी पाळण्यात येणारा काळा दिन आणि कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी रविवारी सायंकाळी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
शहरात राज्योत्सवाची मिरवणूक असते. त्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीची मूक सायकलफेरी असते. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठी भाषिक या सायकलफेरीत भाग घेतात. या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
1 नोव्हेंबरसाठी 3 डीसीपी, 12 एसीपी, 52 पोलीस निरीक्षक, 2500 पोलीस व इतर अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. याबरोबरच शहर सशस्त्र दलाच्या 9 आणि राज्य राखीव दलाच्या 10 तुकडय़ा बंदोबस्तात असणार आहेत. 500 होमगार्ड तैनात करण्यात येणार असून मिरवणुकीतील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी 8 ड्रोन कॅमेऱयांचा वापर करण्यात येणार आहे.
सध्या विविध ठिकाणी असलेल्या 300 सीसीटीव्ही कॅमेऱयांव्यतिरिक्त 35 व्हिडिओ कॅमेऱयांचेही मिरवणुकीतील घडामोडींवर लक्ष असणार आहे. स्वतः पोलीस आयुक्त मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवडय़ापासून विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांच्या बैठका घेऊन चर्चाही करण्यात आली आहे.