विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालणार : मंडळांकडून राबविले विविध कार्यक्रम
खानापूर : खानापूर शहर तसेच ग्रामीण भागात गेले 9 दिवस गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा करण्यात आला. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले. गेल्या नऊ दिवसात अत्यंत उत्साहात असलेले गणेशभक्त आज गुरुवार दि. 28 रोजी गणरायाला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देणार आहेत. नगरपंचायतीने तयारी पूर्ण केली असून विसर्जनासाठी पाणीही अडवले आहे. गुरुवारी दुपारनंतर मलप्रभा नदीघाटावर घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू होणार आहे. शहरात विविध भागातून घरगुती गणपतींचे वाजतगाजत फटाक्यांच्या आतषबाजीत मलप्रभा नदीघाटावर पोहचणार आहेत. घाटावर विसर्जनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. गल्लोगल्लीचे गणपती एकत्रित करून वाहनातून फटाक्यांच्या आतषबाजीत आणले जाणार आहेत. रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जनासाठी मलप्रभा नदीघाटावर गर्दी होणार आहे. बुधवारी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सर्वच रस्ते गणेशभक्तांनी फुलून गेले होते. यावर्षी सर्वच गणेशमूर्ती अत्यंत पाहण्याजोग्या आहेत.
मिरवणूक मार्गावर भव्य स्वागत करणार
सायंकाळी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या शेवटच्या आरतीनंतर श्रीफळांचा लिलाव होऊन गणेशमूर्ती विसर्जनासाठी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शहरातील विविध मार्गावर गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी, बँड, बेन्झो आदी वाद्यांना प्राधान्य दिले आहे. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू राहणार आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजकम बंधाऱ्याच्या पुलावऊन सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी नगरपंचायतीने खास व्यवस्था केली आहे. यासाठी क्रेनद्वारे रात्री एकामागून एक सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळाजवळ तसेच नदीघाटावर fिवद्युत रोषणाई व स्वीमरची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मंडळाच्या मिरवणुका शांततेने पार पडण्यासाठी यावेळी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, पोलीस उपनिरीक्षक तसेच त्यांच्या सहकारी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातही भावपूर्ण वातावरणात होणार गणेश विसर्जन
खानापूर शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागातही घरोघरच्या गणपतींबरोबरच सार्वजनिक गणपतींचे अत्यंत भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात येणार आहे. शिवाय नंदगड, गर्लगुंजी, गुंजी, करंबळ, चापगाव, कारलगा, हलशी, जांबोटी, कणकुंबी आदी भागातील सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.