ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सिताराम गायकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार अकोले येथे आले होते. त्यावेळी अजित पवारांनी गायकरांचा प्रचार करू नये, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला. त्यानंतर पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या विरोधात गायकर यांनी रणशिंग फुंकले आहे. 2019 साली राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या मधुकर पिचड आणि सिताराम गायकर यांच्या विरोधात अजित पवार यांनी सभा घेत सिताराम गायकर यांचे धोतर फेडणार अशी वल्गना केली होती. मात्र, आता अकोले सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पिचडांपासून बाजूला होत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सिताराम गायकर यांच्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी सीताराम गायकर यांचा प्रचार करू नये, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविला.
जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी माघार घेताना शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी गायकर यांना कारखान्याच्या निवडणुकीत न घेण्याची अट घातली होती. मात्र, अजित पवारांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे अजित पवार यांना व्यासपीठावर जाऊन थेट सवाल करण्याचा इशारा दशरथ सावंत यांनी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने सभेपूर्वीच सावंत यांना ताब्यात घेतले होते.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या मागे मोठं षढयंत्र; मला त्यांची काळजी वाटते