उत्तम पार्सेकर : राज्यातील विविध कामांचा आढावा
पणजी ” ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ या अंतर्गत राज्यात साधन-सुविधांचे जाळे विणण्यात आले आहे. या सर्व कामांचा आढावा वेळोवेळी घेतला जात असून, राज्यातील ग्राहकांसाठी नळ जोडणी आणि पाणी बिल भरण्याची प्रक्रिया सुटसुटीत होण्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने भर दिला आहे. साबांखा खात्यातर्फे अॅप सुरू करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियांता उत्तम पार्सेकर यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्य निबंधक त्रिवेळी वेळीप ह्याही उपस्थित होत्या. पार्सेकर म्हणाले, राज्यातील अनेक भागात आजही पाणीसमस्या जाणवत असल्याच्या तक्रारी खात्याकडे येतात. यावर उपाय म्हणून आता एक अॅप काढण्यात आले असून, आपल्या मोबाईलवरून या अॅपला स्कॅन केल्यास आपली तक्रार दिल्यास अवघ्या काही तासांत सार्वजनिक बांधकाम खात्याचे वाहन आपल्याला पाणी पुरवण्यासाठी हजर होईल. तसेच पाणी बिल भरण्यासाठी ऑनलाईन ही पद्धतही राबविण्यात येत असल्याने त्याचा लाभ राज्यातील सुमारे 80 टक्के जनतेला होत असल्याचा दावाही पार्सेकर यांनी केला. राज्य निबंधक त्रिवेणी वेळीप यांनी सांगितले की, राज्यात विविध सरकारी दस्ताऐवज व जागेसंबंधी इतर नोंदणी करण्यासाठी नागरिकांना सहजरित्या व्हावी, यासाठी निबंधक कार्यालयातर्फे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ऑनलाईन प्रक्रियाही राबविण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील सर्व पंचायतीमध्ये उपनिबंधकांच्या उपस्थितीत थेट संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीच्या नोंदीबाबत किंवा राज्य निबंधक कार्यालयाशी संबंधित असणाऱ्या सर्व अडचणीबाबत यावर चर्चा करण्यात येणार आहे. नागरिकांकडून आलेल्या सूचना व हरकती ह्या उपनिबंधकांमार्फत नोंदविल्या जाणार असून, सर्व पंचायतीत राबविण्यात येणारा थेट संवाद कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जुनाट जलवाहिनींवर विचार सुरू
राज्यात आजही पोर्तुगीजकालीन जलवाहिनी अस्तित्वात आहेत. ह्या जलवाहिन्या बदलण्यावर सार्वजनिक बांधकाम खाते विचार करीत आहे. राज्यात जलवाहिनीचे जाळे हे मोठे असल्याने योग्य अभ्यासाअंतीच जुनाट जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी सांगितले.
झुआरी उर्वरीत कामे सप्टेंबरअखेर पूर्ण
झुआरी नदीवर उभारण्यात आलेला उ•ाणपूल हा राज्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. हा पूल सध्या वाहतुकीसाठी खुला असला तरी उर्वरित कामे सप्टेंबरअखेर पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते प्रयत्नशील आहे, अशी माहिती उत्तम पार्सेकर यांनी दिली.