दुचाकीधारकांना दिलासा, दैनंदिन प्रवास होणार सुखकर
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकात दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याने प्रवाशांच्या मागणीला यश आले आहे. जुने बसस्थानक हटविण्यात आले होते. दरम्यान, दुचाकी पार्किंगची व्यवस्थाही इतरत्र करण्यात आली होती. मात्र, मागील चार-पाच वर्षांपासून पार्किंगअभावी दुचाकीधारकांची गैरसोय होत होती. मात्र, आता नवीन मध्यवर्ती बसस्थानकात दुचाकींच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. नवीन सुसज्ज बसस्थानक उभारण्यासाठी 2016 मध्ये जुने बसस्थानक हटविण्यात आले. दरम्यान, बसस्थानकात असलेले दुचाकी पार्किंग इतर ठिकाणी सुरू करण्यात आले. मात्र, बसस्थानक एकीकडे आणि दुचाकी पार्किंग दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये दुचाकीधारकांची मोठी गैरसोय होत होती. दुचाकी पार्क करण्यासाठी बसस्थानक सोडून जावे लागत होते. दरम्यान, या घाईगडबडीत बसही वेळेवर मिळत नव्हती. त्यामुळे बसस्थानकातच पार्किंगची व्यवस्था करा, अशी मागणी प्रवाशांतून होत होती. मध्यवर्ती बसस्थानकातून दैनंदिन लांब पल्ल्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवाशी बसस्थानकात दुचाकी पार्क करून पुढील प्रवास बसने करतात. त्यामुळे बसस्थानकात दुचाकी पार्किंगची व्यवस्था अत्यावश्यक आहे. मात्र, मागील पाच-सहा वर्षांपासून दुचाकी पार्किंगची व्यवस्था बसस्थानक सोडून इतरत्र करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती.
प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ
स्मार्ट सिटीअंतर्गत मध्यवर्ती बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. 300 कोटांच्या निधीतून सुसज्ज बसस्थानक आणि इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शिवाय जूनपासून शक्ती योजनेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. मात्र, बसस्थानकात दुचाकी पार्किंगची व्यवस्था नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. आता बसस्थानकात दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुखकर होऊ लागला आहे.
बेळगावातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक
बेळगाव येथून दररोज निपाणी, चिकोडी, हुक्केरी, अथणी, गोकाक, कोल्हापूर, कित्तूर आणि सौंदत्ती या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. विशेषत: नोकरदार आणि कामगारांची संख्याही मोठी आहे. असे प्रवाशी बसस्थानकापर्यंत दुचाकी घेऊन येतात आणि दुचाकी पार्क करून तेथून पुढील प्रवास बसने करतात, अशा प्रवाशांसाठी ही पार्किंग व्यवस्था सोयीस्कर झाली आहे.