प्रायोगिक तत्त्वावर गॅसशवदाहिनीवर अंत्यविधी
प्रतिनिधी / बेळगाव
सदाशिवनगर स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनीचे परिवर्तन गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती. अखेर शवदाहिनीच्या परिवर्तनाचे काम पूर्ण होत आले असून याची पाहणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांनी मंगळवारी केली. तसेच प्रायोगिक तत्त्वावर बेवारस मृतदेहाचा अंत्यविधी गॅसशवदाहिनीवर करण्यात आला.
सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसविण्यात आली आहे. याकरिता महापालिकेने 65 लाखांचा निधी खर्च केला होता. मात्र डिझेलवर अंत्यविधी करण्यासाठी तब्बल चार ते साडेचार तासांचा अवधी लागत आहे. तसेच 60 लिटरहून अधिक डिझेल लागत असल्याने अंत्यविधीसाठी 6 हजारांहून अधिक खर्च होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचप्रमाणे एका अंत्यविधीसाठी चार ते पाच तासांचा वेळ लागल्यास दिवसभरात केवळ तीन अंत्यविधी होऊ शकतात. सदर डिझेलवर चालणारी शवदाहिनी खर्चिक बनल्याने अंत्यविधी करण्याकडे पाठ फिरविण्यात आली होती. डिझेलवर चालणाऱया शवदाहिनीचे काम व्यवस्थित झाले नसल्याचे निदर्शनास आले होते.
त्यामुळे सदर शवदाहिनीचे परिवर्तन गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. याकरिता काही संघटना व कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. याबाबत आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी पाहणी करून मेघा गॅस आणि महापालिकेच्या अभियंत्यांशी चर्चा केली होती. या शवदाहिनीचे गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्याची सूचना केली होती. याची दखल घेऊन मेघा गॅस कंपनीने शवदाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. तसेच शवदाहिनीकरिता गॅसवाहिनी घालण्यात आली आहे. अंत्यविधीकरिता नवीन गॅसबर्नर बसवून दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे.
अंत्यविधीसाठी एक तासाचा वेळ, 2 हजाराचा गॅस खर्च
डिझेलवर चालणाऱया शवदाहिनीचे गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तनाचे काम पूर्णत्वास आले असून मंगळवारी प्रायोगिक तत्त्वावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी गॅसशवदाहिनीची पाहणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांनी केली. सध्या प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या अंत्यविधीसाठी एक तासाचा वेळ लागला. तसेच 2 हजार रुपयांचा गॅस खर्च झाला. यामध्ये आणखी काही त्रुटी आहेत का? याची चाचपणी अंत्यविधीवेळी करण्यात आली. गॅस व वेळ वाचविण्यासाठी आणखी काही सुधारणा करता येवू शकतात का? याची पाहणी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या अंत्यविधीवेळी मेघा गॅसच्या अभियंत्यांनी केली. यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.