विमानतळावरील कचरा एकत्रीकरणाची शेड : आगीत दोघे कर्मचारी गंभीर जखमी,स्फोटानंतर आग लागल्याचा संशय
वास्को : दाबोळी विमानतळानजीक एका कचरा साठवणुकीच्या शेडमध्ये आग भडकण्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत या शेडमध्ये काम करणारे दोघे जण जखमी झाले असून त्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. आग भडकण्याचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीलपासून जवळपास अडिचशे मिटर अंतरावर दाबोळीतील महामार्गाला लागूनच असलेल्या कचऱ्याच्या शेडमध्ये ही आग भडकली. ही शेड पत्र्यांची असून त्यात दाबोळी विमानतळावरील सर्व प्रकारचा कचरा साठवून ठेवण्यात येतो. तिथेच या कचऱ्याचे वर्गीकरणही करण्यात येते व त्याची वाहतुकही करण्यात येते. त्यात कचऱ्याचे गठ्ठे तयार करण्यासाठी बेलिंग मशिनही आहे.
दोघे कर्मचारी भाजले
काल या शेडमध्ये कचऱ्याची हाताळणी चालू असताना अचानक आगीचा भडका उडाला. त्यामुळे दोघे कामगार भाजले. दोघेही ओरडतच या शेडमधून बाहेर पडले. त्यांना प्रथम चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांची रवानगी गोमेकॉमध्ये करण्यात आली.
तीन तासांनंतर आग आटोक्यात
या आगीत प्लास्टीकसह सर्व कचऱ्याने पेट घेतला. अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन ही आग विझवीण्याचा प्रयत्न केला. नौदलाच्या अग्निशामक दलानेही या बचावकार्यात सहकार्य केले. तब्बल तीन तासांनंतर ही आग पूर्णपणे विझविण्यात यश आले.
आगीच्या कारणाबद्दल संयश
कचऱ्याच्या शेडमध्ये ही आग नेमकी कशी लागली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किट किंवा मशिन हाताळताना कचऱ्याच्या साठ्यामधील एखाद्या रासायनिक पदार्थाने उष्णतेमुळे पेट घेतला असावा असा संशय आहे. दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव यांनी या घटनेची पाहणी केली. तसेच जखमी कामगारांचीही भेट घेतली. कचऱ्याच्या शेडमध्ये आग लागण्याच्या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे राव यांनी म्हटले आहे.