राज्योत्सव संपवून परतताना अपघात
बेळगाव : भरधाव क्रूझर उलटून पाच जण जखमी झाले. बुधवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास बेळगाव-गोकाक रोडवरील कणबर्गीजवळ ही घटना घडली असून राज्योत्सवात भाग घेऊन गावी परतताना ही घटना घडली आहे. काडेश हडगूर (वय 23), निंगाप्पा गुरवगोळ (वय 28), सुदीप लक्कण्णावर (वय 20), बसवराज सुतगट्टी (वय 21) सर्व राहणार उरबीनहट्टी, ता. गोकाक, भरतेश बोरगाली (वय 19) रा. कोण्णूर, ता. गोकाक अशी जखमींची नावे असून बुधवारी रात्री उशिरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उरबीनहट्टी परिसरातील तरुण राज्योत्सवासाठी क्रूझरमधून बेळगावला आले होते. गावी परतताना कणबर्गीजवळ क्रूझर उलटून पाच जण जखमी झाले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.